
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे अर्ज भरण्याकरिता 14 डिसेंबरपासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 29 टक्के अर्ज भरण्यात आल्याची नोंद झालेली आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी या वेबसाईटवर 15 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन भरून घ्यावे. महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने भरून घेण्याचे नियोजन करावे.
महाविद्यालयांनी गेल्या वर्षी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज त्रुटींची पूर्तता करून विहित मुदतीत कार्यालयात मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करावे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील. विहित कालावधीनंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व प्राचार्यांनी नोंद घ्यावी असे, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी कळविले आहे. या बाबतीत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कार्यालय समाज कल्याण भंडारा येथे संपर्क करावा.