
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नांदेड :- कंधार लोहा तालुक्यातील तीन गावातील साठवण तलावासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील हप्ता मंजूर झाला आहे. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलून सदर निधी वर्ग करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार मृद व जलसंधारण विभागाचे वसंतराव गालफाडे यांनी खा.चिखलीकर यांच्या सांगण्यावरून सदरचा चेक शेतकऱ्यांकडे सुपूर्द केला.
खा.चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे गोगदरी, कंधारेवाडी आणि रामाचीवाडी या गावातील शेतकऱ्यांना चार कोटी 25 लाख रुपये 91 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यामुळे भूसंपादनाचा निधी कधी मिळणार ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा गोगदरी गावकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे आता संपली आहे. कंधार, लोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. याशिवाय या भागातील शेतकऱ्यांच्या जलसिंचनासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा ठेवला आहे.
या अनुषंगाने कंधार तालुक्यातील गोगदरी आणि कंधारेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी घेण्यात आली होती. या तिन्ही साठवण तलावाची उभारणी पूर्ण झाली आहे. साठवण तलावासाठी या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना यापूर्वीच खा.चिखलीकर यांच्या पुढाकारातून भूसंपादनाच्या मावेजा म्हणून पहिला हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर आता गोगदरी, कंधारेवाडी आणि रामाचीवाडी येथील शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 25 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.
मृदू व जलसंधारण विभाग औरंगाबादचे अधीक्षक अभियंता वसंतराव गालफाडे यांच्या माध्यमातून गोगदरी, कंधारेवाडी गावकऱ्यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला होता. गोगदरी साठवण तलावातून 162 हेक्टर , कांधारेवाडी साठवण तलावातून 143 तर रामाचीवाडी साठवण तलाव अंतर्गत 210 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
गोदावरी येथील साठवण तलावात ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन गेली त्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 27 लाख 26 हजार रुपये, कंधारेवाडी येथील शेतकऱ्यांसाठी 84 लाख 84 हजार रुपये तर रामाचीवाडी साठवण तलावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 13 लाख 81 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे .सदरील धनादेश पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
भूसंपादनासाठीचा निधी मंजूर करण्यात आल्याने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आज विक्रम बोईनवाड, तंटामुक्ती अध्यक्ष गणपती कल्याणकर, भाऊराव कल्याणकर, रावसाहेब कल्याणकर , शेषराव कल्याणकर, बालाजी कल्याणकर , राहुल कल्याणकर , माजी उपसरपंच मोहन कल्याणकर , आनंदा कल्याणकर यांच्यासह अनेकांनी समक्ष भेटून सत्कार करुन आभार मानले.