
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. पण सोमवारपासून नव्हे तर 24 जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत. तर पुणे आणि औरंगाबादमधील शाळा या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलंय.
चर्चा करुन निर्णय घेणार
पुणे शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना 24 तारखेपासून शाळा सुरू कराव्या अस वाटत नाही. आम्ही अजून द्विधा मनस्थितीत आहोत अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. पालक संघटना आणि बालरोग तज्ञांशी चर्चा करुन शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.
सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लहान मुले बाधित होण्याचं प्रमाण साडेचार-पाच टक्क्यांवर गेलं आहे. गेल्या एका महिन्यात जवळपास साडे तीन हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली असून अजूनही 64 मुलं ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.
मराठवाडा तसेच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सोमवारपासून शाळा सुरू होणार नसल्याची माहिती औरंगाबादच्या प्रशासनाने दिली आहे. येत्या आठवड्याभरात परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरु होतायत मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
महाविद्यालयं ऑफलाईन सुरु करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सोमवारपासून शाळा सुरु होतायत. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
शाळा सुरु होत असताना महाविद्यालयं कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. महाविद्यालयांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती उच्च आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. दरम्यान 15 फेबुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ठाम असल्याचं सामंत यांनी सांगितलंय.