
दैनिक चालु वार्ता
नळगीर/प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
कोल्हापूर :- कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीने दिला जाणारा मानाचा उत्कृष्ट बालवाड:मय पुरस्कार ‘बालसाहित्य वाटा आणि वळणे’ या समीक्षा ग्रंथास जाहीर झाला असल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. प्रा. रामदास केदार हे शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वाढवणा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. या अगोदर या समीक्षा ग्रंथाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे चा शंकर सारडा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चा विशेष ग्रंथकार पुरस्कार, बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातुरचा पुरस्कार तसेच चंद्रपूर येथील शब्दांगण साहित्य परिषदेचा उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार मिळाला आहे.
प्रा. रामदास केदार यांनी कोरोना काळात १७४ बाल पुस्तकांची समीक्षा लेखन केलेले आहे .तर आकाशवाणी परभणी केंद्रावरून ते महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांची ओळख करून देत आहेत. त्यांची मराठवाड्याची आई, गळफास,घिसाड्याचं पोर, प्रायश्चित्त, पोखरून पडलेली माणसं, बीन बुडाची माणसं, बन्याची शाळा, गंप्या गुराखी, चिमणी चिमणी खोपा दे, पाऊस माझ्या मनातला, गुरुजींच्या कविता, कस्तूरी, शब्दांकुर, गावची जत्रा कारभारी सतरा, डोळ्यात दाटले पाणी, बैल दौलतीचा धनी ,कपाटातील पुस्तके इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. . बेला, प्रायश्चित्त, घुसमट, मैतर ,बिंधास जीवन या चित्रपटांच्या पटकथा व गीतलेखन केले आहे.
बालसाहित्य लेखनासाठीचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव चंदन पाटील,साहित्य सभेचे कार्यवाह मिलींद कोपर्डेकर, श्रीकांत पाटील, साहित्यिक संजय ऐलवाड, सुनिताराजे पवार, रसूल पठाण, विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, एकनाथ आव्हाड, भास्कर बडे लक्ष्मण बेंबडे ,अंकुश सिंदगीकर, विरभद्र मिरेवाड यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक, पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.