
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- “गृहविलगीकरणातच कोविड 19 मधून बरे होत असलेल्या देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या पाहता, लाभार्थ्यांना वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी (टेलीमेडीसीन) दूरध्वनी वैद्यकीय सल्ला सेवांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे” असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
राज्यांचे आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि नऊ राज्ये/केंद्रशासित प्रदेश (जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेश) च्या प्रशासकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल यावेळी उपस्थित होते.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हब आणि स्पोक मॉडेलचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि दूरदृश्य-सल्लागाराची अधिकाधिक केंद्रे उघडली जातील याची खातरजमा करण्यास सांगितले. यामुळे जिल्हा केंद्रांवर तैनात असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला मिळणं लाभार्थींसाठी सोपे होईल. ईसंजीवनी, 2.6 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना सेवा प्रदान करण्यात सक्षम आहे. इथे लोक घरातूनच वैद्यकीय सल्ला प्राप्त करु शकतात असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सध्या रुग्णसंख्या वाढत असताना, दक्षता आणि सतर्कतेच्या गरजेवर भर दिला. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणत्याही परिस्थितीसाठी अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी. कमतरता असेल तर वेळेवर खरेदीची मागणी नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.