
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी औरंगाबाद
मोहन आखाडे
_•राष्ट्रीय मतदार दिवस थाटात साजरा
_•मतदार जागृती दालन, सेल्फी पॉइंट, लोकशाही भिंतचे उद्घाटन
_•पथनाट्यातून केली मतदार जागृती, नवमतदारांना ओळखपत्रांचे वाटप
_•स्वीप संकेतस्थळाचे लोकार्पण, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
_•उत्कृष्ट कामाबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा गौरव
_•‘लोकशाही समजून घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन
लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक चळवळ तरूणांमुळे यशस्वी झालेली आहे. देशातील तरूणाईंची संख्या लक्षात घेता लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात डॉ.येवले बोलत होते.
कार्यक्रमास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार, प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मयी सुमीत, अभिनेता मकरंद अनासपुरे, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.श्याम शिरसाट, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांची मंचावर उपस्थिती होती. डॉ.येवले यांनी देशाची प्रत्येक अडचण सोडविण्याची ताकद भारतीय संविधानात आहे. या संविधानाचा तरूणाईने बारकाईने अभ्यास करावा. या हेतूने विद्यापीठात ‘भारतीय संविधान’, ‘राजकारणातील प्रवेश’ विषय पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
शिवाय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याशी झालेल्या चर्चेअंती आवश्यक असणारे निवडणूक प्रक्रियेबाबतचे क्रेडिट कोर्स अभ्यासक्रम देखील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सुदृढ लोकशाहीसाठी तरूणाईने राजकारण, भारतीय संविधान, निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरूणाईमध्ये लोकशाही मुल्ये रूजावीत, त्यांची जागृती व्हावी यासाठी विविध माध्यमातून विद्यापीठ कार्य करत असल्याचे डॉ.येवले म्हणाले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अभिनव कामकाज पद्धतीचे कौतुक केले. त्यासह सर्वच मतदारांची छायाचित्रांसह असलेली औरंगाबाद जिल्ह्याची मतदार यादी अद्यावत अशी आहे. शिवाय सातत्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रिया कामकाज पार पाडण्यात येते. सुलभ, सर्वसमावेशक, सहभागपूर्ण निवडणुकांसाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
मराठी शाळेच्या सदिच्छा दूत असलेल्या अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी लोकशाही प्रक्रियेत प्रजाच राजा आहे. मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा. मताचे मोल ओळखावे. मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा व्हावा. यासाठी सर्व तरूण मंडळींनी संवेदनशीलपणे लोकशाहीचा हा सोहळा मतदान करून साजरा करावा. भारतीय संविधानाने सर्वांना मताचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे. हा हक्क तर प्रत्येकाने बजावावाच, परंतु इतरांनाही प्रेरीत करावे, असे आवाहन अभिनेत्री चिन्मयी यांनी केले. सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्याहस्ते स्वीप संकेतस्थळाचे लोकार्पणही करण्यात आले.
अभिनेता अनासपुरेंनी दुर्गम भागात मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मतदानाचा हक्क बजावला, त्याच जबाबदार नागरिकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होणे उचित असल्याचे मत मांडले. ग्रामीण भागात मताचे मोल कळावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. हिवरेबाजार सारख्या ग्रामपंचायतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांनी वाटचाल करायला हवी. निर्भिड, निस्पृह, पारदर्शकपणे मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास मत द्यावे, असेही अनासपुरे म्हणाले.
डॉ.पवार यांनी ‘लोकशाही समजून घेताना’ पुस्तकाबाबत सांगताना लोकशाहीचा मागोवा घेणारा हा ग्रंथ असल्याचे सांगितले. शिवाय हा ग्रंथ ऑनलाइन स्वरूपातही किंडल, इ-बुक आणि इ-पब आदी ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. वाचकांनी ‘लोकशाही समजून घेताना’ वाचल्यावर त्यांच्या सूचनांचे स्वागतच होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.देशपांडे यांनी मतदार दिवसाची पार्श्वभूमी विषद केली. या दिनाचे औचित्य साधून अधिकाधिक युवांपर्यंत पोहचण्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा हेतू आहे. अधिकाधिक युवांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाही बळकटीकरणासाठी युवांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या डॉ. पवार संपादित ‘लोकशाही समजून घेताना’ पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. शिवाय भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे राष्ट्रीय मतदार दिनाचा संदेश दिला. यामध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवात आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो आहोत, ही गौरवाची बाब असल्याचे नमूद केले. नव मतदारांना वर्षातून चारदा नाव नोंदणीची सुविधा आयोगाने दिल्याचेही त्यांनी संदेशात सांगून सर्वांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
निवडणूक प्रक्रियेत चांगले काम करणाऱ्या बीएलओ ते जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत सर्व स्तरावरील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांचा सपत्नीक मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनाही यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. जिल्हा कार्यालयांच्या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार ‘लोकमत’चे डॉ. विकास राऊत, उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कार मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मन्सुख झांबड आणि बजाज ऑटो लि.च्या सीएसआरचे प्रमुख सल्लागार सी.पी.त्रिपाठी यांना प्रमाणपत्र, भारतीय संविधानाची प्रत देऊन मान्यवरांनी कार्यक्रमात सन्मानित केले.
उत्कृष्ट समाज माध्यम कार्यालय म्हणून सिंधुदुर्ग, धुळे आणि अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा गौरव करण्यात आला. विशेष संस्थात्मक योगदान पुस्कार रिजनल आऊटरीच ब्युरो, महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांना प्राप्त झाला. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. येवले यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ सर्वांना दिली. कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमामध्ये स्वीप कार्याची ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप, विद्यापीठातील स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. घरगुती गणेशोत्सव सजावट, लोकशाही भोंडला, लोकशाही दीपावली, रांगोळी आदी राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांची नावेही कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली. सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
विविध कार्यक्रमांनी रंगत कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्याहस्ते मतदार जागृती दालनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर अभिनेता अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी यांनी मतदान प्रक्रियेबाबतचा सापशिडीचा खेळ खेळला. सेल्फी पॉइंट, लोकशाही भिंतीजवळ छायाचित्रे मान्यवरांनी घेतली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि शिवाजी महाविद्यालय व विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागांनी पथनाट्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यगृहातील भव्य रांगोळी, स्पर्धात्मक रांगोळींचीही मान्यवरांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमात गायक राहुल खरे, संगीतकार गजानन साबळे यांनी मतदान जनजागृती गीत उत्तमरित्या सादर केले.