
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
हर्सुल :- हर्सुल येथील सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन असे प्रकल्प भविष्यातील गरजेनुसार मोठ्या स्वरुपात राबविण्याची सुचना श्री. देसाई यांनी केली. यावेळी आमदार अंबादास दानवे, महानगरपालिका आयुक्त आस्तीक कुमार पांडेय, महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख श्री.जोशी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इकोसत्व आणि सीआरटी या कंपन्यांद्वारे महानगरपालिकेकडून गोळा झालेला सुका कचरा येथे स्वीकारल्या जाऊन त्याचे कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण, बांधणी करुन संबंधीत रिसायकलींग करणाऱ्या कंपन्यांकडे पाठविले जाते. सध्या दहा टन सुका कचऱ्याचे वर्गीकरण येथे केले जाते. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी शहरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामाचीही पाहणी करुन काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची सुचना संबंधितांना केली. 14 एकरमध्ये असलेल्या या घनकचरा प्रकल्पात 150 मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होणार असून सुका कचऱ्याचेही संकलन होणार असल्याची माहिती श्री. पांडेय यांनी यावेळी दिली.