
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी
गुणाजी मोरे
लातूर :- दोन दिवसांपूर्वी लातूर शहरात दिवसाढवळ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या खुनातील आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता पाच हजार रुपयांसाठी आपण हत्या केल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवार दि.23 जानेवारी रोजी लातूर शहरातील विशाल नगर येथे दिवसाढवळ्या राहुल सुरेश उजळंबे या विद्यार्थ्याचा खून झाला आणि शहरात खळबळ माजली.
लातूर पॅटर्न महाराष्ट्र आणि देशात प्रसिद्ध असल्याने इथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ही घटना घडल्याने पालकांत आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी खून करून पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून सोलापूर आणि पुण्याला पथके पाठविली. दरम्यान, तो पुण्यात भोसरीला गेल्याचे कळल्याने तिथेही त्याच्या नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र, तो तिथे आढळून आला नाही.
आरोपी पुण्याहून लातूरला येत असल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी त्याला पीव्हीआर चौकात मंगळवारी अटक केली. आरोपी आणि मयत राहुल हे दोघेही अल्पवयीन आहेत. दोघे चांगले मित्र होते. ज्या दिवशी खून झाला त्यादिवशी दोघे सोबत दुचाकीवरून शहरात फिरले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आरोपीने सोबत हत्यार ठेवले होते. आठ दिवसांपूर्वीही दोघात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद पैशावरून झाल्याचे समजते.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याच्या मोबाईल लोकेशन आणि इतर माध्यमातून पोलिसांनी तो कुठे आहे? याचा तपास लावला. अटक केल्यानंतर आरोपीची चौकशी केली असता आपल्याला गुन्हा केल्यानंतर प्रचंड पश्चाताप होत असल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय, हा खून आरोपीने आपला चुलत भाऊ यानेही कोणाचा तरी खून केला त्या भावाला आदर्श मानून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
आरोपीचे वय १७ वर्ष ४ महिने असून, ज्याचा खून झाला त्याचे वय १७ वर्ष ९ महिने असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार मिरकले आदींची उपस्थिती होती. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजीवकुमार मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, देशमुख, चव्हाण, चिंचोलकर, बेल्लाळे, फुलारी, राजपूत, ओगले, मदने, जाधव, बोपले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सूर्यवंशी, काझी, चिलमे, वहिद शेख, रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के आदींनी मोलाची कामगिरी बजावली.
गुन्ह्यापूर्वी ठेवले होते इन्स्टाग्रामवर स्टेट्स….
सध्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनचा आणि सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. गुन्हा करण्यापूर्वी आरोपीनेही त्याच्या मनात जे चालले आहे त्याचे इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवले होते. त्याच्यावर एका चित्रपटाचा प्रभाव झाल्याचे दिसून आले आणि त्यातूनच त्याने हा गंभीर प्रकार केल्याचेही अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सध्या तरुणांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक दिसतो आहे. पालकांनीही आपला पाल्य काय करतोय? कोणासोबत राहतोय? त्याच्या सोशल मीडियावर तो कशा पोस्ट टाकतो आहे? हे पाहण्याची गरज आहे, असे यावेळी पोलीस निरीक्षक संजीवकुमार मिरकले यांनी यावेळी आवाहन पालकांना केले.
व्हायचे होते डॉक्टर… झाला खुनी
आरोपीस मंगळवारी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत आपण हा खून पैशातून आणि आपल्या एका खुनी चुलत भावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. गुन्हा केल्यानंतर प्रचंड पश्चाताप होतो आहे असेही तो म्हणाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दहावीत खूप चांगल्या गुणांनी आरोपी उत्तीर्ण आहे. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी तो लातुरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
त्याने गुन्हा मान्य करून ढसाढसा रडत होता, असेही पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले. पैशांच्या कारणावरून झालेला हा वाद इतका विकोपाला गेला आणि यातून एका मित्राने आपल्या मित्राचा जीव घेतला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगार हे वय वर्ष १४ ते २१ च्या वयोगटातील असून, असे गुन्हे भविष्यात घडू नयेत यासाठी तरुणांचे समुपदेशन करण्याची गरज आहे.