
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- .दि 26 नोव्हेंबर 1949, व 26 जानेवारी 1950 हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला.त्यानंतर दोनच महिन्यात म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.या घटनांची आठवण म्हणून देशात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता.
स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताचे राज्य घटना तयार करण्याचे काम तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सुरू होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला.संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आले.देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारी पासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले. भारत देश या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला म्हणून हा 26जानेवारी दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय शेंबा बु. येथे प्रजासत्ताक दिन (गणराज्य दिन) मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शेंबा येथील (C.R.P.F)सैनिक पदावर कार्यरत असलेले मंगेश मु. भिडे निमंत्रित होते. ग्रामपंचायत कार्यालय शेंबा येथे सकाळी सात वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे तथा गावकरी मंडळी व सरकारी कर्मचारी यांच्याद्वारे संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रत चे वाचन केल्यानंतर नंतर सरपंच ॲड. नंदकिशोर खोंदले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले.
त्यानंतर उपसरपंच जगन्नाथ भोपळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर शेंबा येथील सैनिक मंगेश मु.भिडे यांचे स्वागत ग्राम सचिव पि.के. राठोड यांनी केले. स्वागत समारंभा नंतर मंडळ अधिकारी ठाकरे साहेब, तलाठी शिरसागर साहेब, तथा ग्रामसचिव राठोड साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भिडे, सुरेंद्र चौधरी, कैलास सुशीर, शेख जब्बार, विजय इंगळे, सुरेंद्र वराडे, सुधाकर बोरकर, तथा ग्रामपंचायत कर्मचारी. निलेश दाभाडे, संतोष बोरकर, राम वानखडे, ई. तसेच युवा कबड्डी खेळाडू व गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश दाभाडे तर आभार प्रदर्शन संतोष बोरकर यांनी केले.