
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार:- देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील महादेइ पनमेशरी दास जिंदाल हायस्कूल न्याहाळे.बु येथे ग्रामीण आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षणात पडलेला खंड याची उणीव या ग्रामीण विद्यार्थ्यांना जाणवू नये या उद्देशाने या मुलांना शैक्षणिक साहित्याचे व धान्याचे किटचे वाटप करून एक आधार देण्याचा प्रयत्न केला.ग्रामीण भागात काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान,आपले मानवाधिकार फाउंडेशन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भरारी सोशल ग्रुप या सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी या तिन्ही संस्थाकडून शाळेला संविधान उद्धेशपत्रिका भेट देऊन संविधान पत्रिकेची शपथ घेण्यात आली.कार्यक्रमात बोलताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सोशल ग्रुपच्या संचालिका अनिता सातपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी भविष्यात तत्पर असल्याचे आवर्जून सांगितले तर आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन भविष्यात शिक्षण किती महत्वाचे आहे हे पटवून दिले तसेच युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश वातास यांनी आपली संस्था करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन शासकीय योजना ग्रामीण तळागाळातील जनतेपर्यंत भविष्यात पोहोचणार असल्याचे सूतोवाच केले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिन्ही संस्था एकत्रित येऊन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.या उपक्रम अंतर्गत संस्थांनी ग्रामीण विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेच्या जीवनाला आपला हातभार लागावा यासाठी ८० विद्यार्थ्यांना व २२ गरीब व गरजू व्यक्तींना धान्याची किटचे वाटप करून तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमावेळी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य शाळेचे सहशिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अशोक तुंबडा यांनी केले.