
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- बदलत्या वातावरणा मध्ये सुरक्षित राहण्यासाठी पृथ्वीचे तापमान आणि पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे आहे . त्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ” माझी वसुंधरा अभियानात ” लोकसहभाग वाढवण्याच्या सुचना पर्यटन , पर्यावरण व वातावरणीय बदल , राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ” माझी वसुंधरा ” अभियानाच्या आढावा बैठकीत पर्यावरणमंत्री बोलत होते . यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार , खासदार इम्तियाज जलील , आमदार अंबादास दानवे , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते .
पर्यावरणमंत्री यांनी औरंगाबाद विभागात या अभियांनातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन विभागातील सर्व जिल्हे उत्तम काम करत असल्याबाबत समाधान व्यक्त करुन सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले . कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामाना करत असतानाच्या काळातही आठ महिन्यांत उल्लेखनीय काम या अभियानातंर्गत झाले आहे . सर्व जिल्ह्यांकडून त्याच पध्दतीने पुढील वर्षातही भरीव काम अपेक्षित आहे . जलसंधारण , वृक्षारोपण , सोलारचा वाढता वापर , यासह विविध पर्यावरणपुरक उपक्रम जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , आयुक्त , लोकप्रतिनिधी या सर्वांनी परस्पर सहकार्याने जबाबदारीच्या भूमिकेतून राबविणे आवश्यक आहे .
बदलत्या पर्यावरणीय वातावरणात टिकाव धरुन राहण्यासाठी जीवीत संरक्षणाला पुरक वातावरण कायम ठेवणे ही काळाची गरज बनली आहे . त्या दृष्टीने या अभियानाची व्याप्ती वाढवत असतांना त्यामध्ये लोकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे सूचित करुन पर्यावरणमंत्री यांनी जनमाणसात माझ्या स्वत:साठी मी काय करु शकतो याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असून त्या दृष्टीने वसुंधरेची सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा ही जाणीव राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायची आहे . असे सांगून स्वच्छ हवा व पाणी कायम मिळवण्यासाठी शाश्वत विकासावर शासनाचा भर आहे .
माझी वसुंधरा अभियानातंर्गत केलेल्या कामामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला आहे . जगभरात या संदर्भातील कामात महाराष्ट्राचा उल्लेख होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे . त्या प्रेरणेतून आपल्याला अवकाळी पाऊस , गारपीट , दुष्काळ , वादळ या वातावरणीय बदलातून उद्भवणाऱ्या आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करायची आहे . त्यासाठी पर्यावरणाचे जतन , समतोल अत्यंत महत्वाचा आहे . हे लक्षात घेऊन जनसहभागासह सर्व यंत्रणांना सोबत घेऊन येत्या वर्षात वनक्षेत्रफळात वाढ करण्यावर भर द्यायचा आहे . असे सुचित करुन पर्यावरण संरक्षणासाठी राबवयाच्या उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांचे स्वागत असून पर्यावरण खात्यामार्फत या कामासाठी आवश्यक सहकार्य मिळेल असे यावेळी सांगितले .
औरंगाबाद विभागात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनात महसून , वन , नगर विकास , ग्रामविकास , सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व संबंधित विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून बांबु लागवड , सोलार वेस्ट मॅनेजमेंट , वृक्ष लागवड , जलसंधारण , पाण्याचा पुर्नवापर , अटल वन , यासह माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रमांद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे . विभागात २०२६ ठिकाणी घनवन उपक्रमांतर्गत २०२०-२१ मध्ये ७३ लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली . तसेच प्रतिव्यक्ती तीन झाडे या अंतर्गत १ कोटी ७५ लाख वृक्षारोपण विभागात करण्यात आले . त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात ७०० रोपांची नर्सरी विकसीत करण्यात आली असल्याचे उपायुक्त ( रोहयो ) समिक्षा चंद्राकार यांनी सांगितले .
पैठण , अंबाजोगाई , उदगीर , बीड , लातूर , परभणी यांसह विभागात सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे . तसेच विविध ठिकाणी अंगणवाडी परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , विविध ठिकाणी पाणवठे तयार करण्याचे काम करण्यात येत असून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अवकाश , वन्यजीवां बद्दलची माहिती देण्याच्या दृष्टीने ॲस्ट्रॉनॉमी क्लब , वाईल्ड लाईफ क्लब , सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती वीणा सुपेकर , यांनी यावेळी दिली . विविध जिल्ह्यांमध्ये माझी वसुंधरा अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी आणि यंत्रणा प्रमुख यांनी दिली .