
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
उदगीर :- उदगीर येथील सामान्य रुग्णालयासाठी बाह्यरुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी तसेच तळमजल्यामध्ये उभारण्यात येत असलेल्या ओ.पी.डी. विभागासाठी विद्युत संच मांडणी करण्यासाठी, ओ.पी.डी. विभागातील फायर अलार्म यंत्रणा बसविण्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर शहराची वाढती गरज लक्षात घेऊन उदगीर येथील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी मागील दोन वर्षापासुन शासन स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील कोरोना काळात उदगीर येथे ऑक्सिजन निर्मीतीचा प्रकल्प तसेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मान्यतेवर काम करण्यात आले आहे.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयातील ओ.पी.डी. बाबत काही प्रश्न होते. येथील ओ.पी.डी. नवीन बाह्य रुग्ण उभा करण्यात येणार असुन यामुळे रुग्णाची सोय होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने ०२ कोटी ३१ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून फायर अलार्म व्यवस्था रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी निर्माण करण्यात आली आहे.
उदगीर शहराची वाढती लोकसंख्या, शेजारी असलेल्या राज्याच्या सीमा व येथून येणारी रुग्णसंख्याचे प्रमाण लक्षात घेता सामान्य रुग्णालयातील आधुनिक व सर्व सोईयुक्त अशी ओ.पी.डी. ची गरज होती. व ती येणाऱ्या काळात पुर्ण होईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.