
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी द.नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
आदरणीय गुरुवर्य प्रा.श्रीकांत नाईक सरांचे आठवणीतील माणसं हे पुस्तक वाचताना दाटीवाटीनं भरलेली साठवणीतल्या माणसांच्या आठवणी वाचून मनात अनेक भावनांची दाटीवाटी झाली. मनात काठोकाठ भरून पावलेल्या माणसांचा सारीपाट कागदावर मांडल्याशिवाय राहवेनाचं..! सरांच्या आयुष्यात अवतरलेला माणूस पानांवर उतरवताना तो प्रत्येक माणूस भावनांच्या ओलाव्यातील मायेचं प्रतीकचं जणू असं वाचताना वाटत होतं. स्वतःभोवतीच्या वलयातील आईवडील,गुरू,विद्यार्थी, सखा-सोबती,सहकारी अशा आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेकविध माणसांनी समृद्ध झालेला हा गोतावळा.
गोतावळ्यातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आणि जगण्याचा मागोवा आदरणीय नाईक सरांनी घेतलेला आहे.प्रत्येक माणूस आदर्श जीवन जगण्याचे एक उदाहरण आहे..नाईक सरांच्या बालपणीचा तो जुना काळ,ती मायेची माणसं. एकत्र कुटुंबातील प्रेम, सहवास आणि संस्कारयुक्त झालेली जडणघडण आणि या जडणघडणीत नात्याच्या प्रत्येक माणसांचं असणारं योगदान यावरून सरांच्या आजच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती येते तेंव्हा त्यामागे त्यांच्यावर बालपणापासून रुजलेल्या संस्कारांची ओळख वाचनातून होते.
आईवरील प्रकरण वाचताना तर मनात अनेक भावनातरंग उठतात. मन मायेच्या ओलाव्यानं दाटून येतं. सुखावून जातं. एकत्र कुटुंबातील आईला कसं सगळ्या लेकरांना मायेनं वाढवावं ,जपावं लागतं.घरातील सर्व माणसांचं जेऊन झाल्यानंतर आईला जेवायला १२ वाजायचे. या उदाहरणावरून एकत्र कुटुंबातील स्त्रीला संसाराच्या रहाट गाडग्यात झोकून द्यावं लागतं. हे यातून कळून येतं. जवळपास ३२ माणसांचा लेखाजोगा पुस्तकातून मांडला आहे.शाळेतील शिपाई कर्मचारी पासून संस्थापक,शिक्षक,विद्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील माणसांचा पसारा मांडताना सरांच्या आयुष्यात जी कोणी माणसं आली त्यांचे स्थान किती खोलवर रुजले आहे याची प्रचिती प्रत्त्येक पानांपानांवर येते.
प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा लाभलेला सहवास ,सहकार्य प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा या सर्वांगाने आपलं जगणं समृद्ध करत असते. जीवनातल्या वाटेवरती सहप्रवासी असणारी ती व्यक्ती जगण्याची प्रेरणा बनून जाते. आपल्या आठवणीतील माणसं ही अशीच काहीशी आहेत.आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांच्याच जगण्याची प्रेरणा झालेल्या आहेत. पुस्तकात प्रत्येक व्यक्तीचे फक्त वर्णनात्मक लेखन नसून त्या व्यक्तीबद्दल अपार भावनात्मक,आत्मीयतापूर्वक लिहिलेले हे चांगुलपणाच्या गुणांचा समुच्चय असणारे आणि प्रत्येक आठवणींना भावनेची किनार असणारे हे भावनाप्रधान पुस्तक आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दडलेलं असतं. ते अव्यक्त स्वरूपातील दिव्यत्व ,भव्यत्व आणि कर्तृत्व शब्दरूपाने सरांनी सुबकपणे व्यक्त केलेलं आहे. लेखणीच्या माध्यमातून त्यांचे विविधांगी पैलू वाचकांच्या समोर आणलेलं आहे. पुस्तकात शिक्षण,समाजकार्याला वाहून घेतलेल्या अनेक माणसांचा धांडोळा घेतलेला आहे. आपले जीवननच आपल्या कार्याला समर्पित केलेली ही माणसं त्याग, समर्पण,आचार-विचार आणि संवेदनशीलता यांचा मोठा संदेश देऊन जातात. आदरणीय अनंत आजगावकर सरांच्या सारखी ऋषितुल्य माणसांचे कार्यकर्तृत्व समाजाप्रती असणारी तळमळ धडपड आणि आपल्या साधेपणातून ही माणसं किती मोठं कार्य करत राहिली.
शाळा स्थापन करून परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे, घडवण्याचे, अनेक नवीन संसार उभा करण्याचे काम अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या हातून झालेले आहे. खरं तर त्यांचे शिष्य असलेल्या नाईक सरांनी अगदी सुक्ष्म प्रसंगातून त्यांच्याविषयी लिहून त्यांचा मोठेपणा ठळक केला आहे. आपण पुस्तक वाचतो पण माणसं वाचणं कशाला म्हणतात ते हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं. आदरणीय नाईक सरांनी नुकतेच अमृतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत तरीदेखील आज त्यांच्या या वयातील व्यक्तिनिरीक्षण,उत्साह,ऊर्जा आणि लिखाणामागची तळमळ अफाट आहे.
नाईक सरांच्या मनात खोलवर रुजलेली आठवणीतील एकेक माणसं वाचताना ती माणसं कधी आपलीशी होऊन जातात कळत नाही.इतकी सहज ,सुलभ, सोपी भाषाशैली,भावनांचा ओलावा,सूक्ष्म प्रसंगवर्णन यावरून सरांच्या अफाट स्मरणशक्तीची आणि संवेदनशिलतेची जाणीव पानांपानांवर होते.मायेच्या, जिव्हाळ्याच्या नात्यांनी जोडलेलं,अतूट भावबंधनांनी सजलेलं धजलेलं समृद्ध आणि संपन्न माणसांचं गणगोत मांडणारं हे पुस्तक म्हणजे सरांच्या मनातील व्यक्त झालेलं व्यापक कुटूंबचं आहे. या पुस्तकातील एकेक माणूस म्हणजे जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा जिताजागता धडा आहे हे निश्चित. कारण माणसं कशी जगली, कशी जगतात त्यांचे आचार ,विचार कार्य,कर्तृत्व यांचा मेळ त्यांच्या जगण्यासोबत घालून दिला आहे. त्यावरून आपणही कसे जगावे ? हे शिकवणारे माणसांचे धडे असणारे हे पुस्तक आहे.
आपण पुस्तक वाचतो पण माणसं वाचणं कशाला म्हणतात ते हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं. आदरणीय नाईक सरांनी नुकतेच अमृतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत तरीदेखील आज त्यांच्या या वयातील व्यक्तिनिरीक्षण,उत्साह,ऊर्जा आणि लिखाणामागची तळमळ अफाट आहे. ‘आठवणीतील माणसं’ हे पुस्तक म्हणजे पुरून उरणारी उरून पुरणारी समृद्ध माणसांच्या आठवणींची शिदोरी आहे…गुरुवर्य श्रीकांत नाईक सरांना निरोगी समृद्ध संपन्न दीर्घायुष्य लाभावे यां मनोकामनेसह पुस्तकाच्या पुढील वाटचालीस हृदयपूर्वक शुभेच्छा देतो…!