
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात जागेवर हजर नसल्याच्या कारणाहून भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी एका ग्रामसेवकास भर कार्यक्रमातूनच फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.याची ऑडिओ सध्या व्हायरल होत असून, या प्रकरणाचा ग्रामसेवक संघटनांकडून निषेध करित हा खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.
देगलूर तालुक्यातील मौजे शेळगाव येथे बांबू लागवड मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी येथील ग्रामसेवक अमोल जाधव हे सदर कार्यक्रमास उशीर होत असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन निघून गेल्याचे पाशा पटेल यांना कोणीतरी सांगितले. त्यानंतर भर कार्यक्रमात पाशा पटेल यांनी सदर ग्रामसेवकास फोन लावला. बोलणे सुरू होताच पाशा पटेल यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत कार्यक्रमाला का आला नाही असे म्हणत तात्काळ येथे हजर झाले नाही तर मी तिथे येईल असा दम देत अपमानित केले.
याची ऑडिओ सध्या व्हायरल होत असून यात पटेल शिवीगाळ करित असल्याचे ऐकु येत आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून, संघटनाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील विविध ठिकाणी काम करणारे ग्रामसेवक.ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दिवसेंदिवस धमक्या, शिवीगाळ करताना दिसत आहे, ग्रामसेवक हा ही तुमच्यातलाच माणुस आहे यापूढे असा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा संघटनेने एका निवेदनात दिला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह राज्यध्यक्ष ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.