
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- गुरुवारी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत पारनेर नगरपंचायत अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षित झाले.
नगरपंचायतीचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आमदार निलेश लंके (नेते)यांचे कट्टर समर्थक व विश्वासू सहकारी विजय सदाशिव औटी पारनेर नगराध्यक्षपदी निवड होणार असल्याचे मानले जात आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७जागांवर विजय मिळवून नगरपंयतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.त्यानंतर आमदार लंके यांनी शिवसेनेला कुठलीही संधी न देता ३अपक्ष नगरसेवकांना गळाला लावत १०नगरसेवकांची गटनोंदणी जिल्हाधिकारी साहेबांकडे केली.यावेळी गटनेते म्हणून विजय सदाशिव औटी तर उपगटनेतेपदी सुरेखा भालेकर यांची निवड करण्यात आली.त्यामुळे बहुमताने सत्ता स्थापन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, आरक्षण काय निघणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.आरक्षणाच्या सोडतीत पारनेर नगरपंचायतीचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी पुरुष नगरसेवकाची निवड होणार असल्याचे निश्चित झाले. ३ वर्षांपूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौ-यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे व वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तात्कालीन पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
त्यावेळी विजूभाऊ औटी आणि त्यांचे बंधू तात्कालीन नगरसेवक नंदकुमार औटी यांनी पारनेर शहरातून लंके यांना खंबीर साथ दिली.त्यावेळचे शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांच्या पारनेर गावात निलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहणा-यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत होती.त्यात नंदकुमार औटी यांचा क्रमांक वरचा होता. लंके यांना साथ देण्याच्या निर्णयाचे राजकीय व व्यवसायिक दुष्परिणाम औटी कुटुंबियांना भोगावे लागले.
परंतु त्याची पर्वा न करता विजूभाऊ आणि नंदकुमार या दोन्ही बंधूंनी विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके यांना पारनेर शहरात खंबीर साथ दिली.त्यामुळे औटी बंधूंच्या निष्ठेचे फळ नगराध्यक्ष पदाच्या रुपाने मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. विजूभाऊ औटी आणि त्यांच्या समर्थकांनी आरक्षण सोडतीनंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी केली.