
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी अनेक सुविधांचा अभाव असून निधी कमतरतेमुळे सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शासनाने लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी रुग्णकल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी मागणी केली आहे.
कंधार तालुक्यात अनेक वाडी तांडा असून शहरातही अनेक गरीब लोक राहतात या लोकांना येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध केली जाते त्यामुळे अनेक रुग्णांना नांदेडच्या रूग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची गरज पडत नाही. परंतु या रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा नाही.
तसेच रुग्णासोबत येणाऱ्या महिलांना आंघोळ किंवा शौचालयात जाण्यासाठी सुविधा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सोबतच परिसरात अस्वच्छता असून त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने साधे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे अशा ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था करून दिल्यास सर्व रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईक यांची सोय होणार आहे तसेच रुग्णालय परिसरात कचरा कुंडीची व्यवस्था केल्यास घाण पसरणार नाही आणि परिसरातील रुग्णांचे किंवा नातेवाईकांचे आरोग्य बिघडणार नाही.
या बैठकीत सर्व सदस्यांनी परिसरातील मोकळ्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पेवर ब्लॉक बसविल्यास स्वच्छता राखली जाणार आहे यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या वतीने लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकरराव श्रंगारे तसेच कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करण्याचा ठराव घेतला असून या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या ग्रामीण रुग्णालयाकडे विशेष बाब म्हणून लक्ष दिल्यास सर्व सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांना होणारा त्रास दूर होणार आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रस्ताव तयार करून शासनाकडून निधी उपलब्ध करून सुविधा निर्माण केल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फार मोठी अडचण दूर होणार आहे. या बैठकीस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर, न.प.चे मुख्याधिकारी दिवेकर, एन.जी.ओ. सदस्य डॉ.दिनकर जायभाये. गटशिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री यु. जि.चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री शादूल शेख, डॉ .महेश पोकले, डॉ. राजू टोम्पे, डॉ. संतोष पदमवार , डॉ.दत्तात्रय गुडमेवार, रुग्णालयीन कर्मचारी सहाय्यक अधिक्षक श्री .ज्ञानेश्वर बगाडे, श्री .दिलीप कांबळे,श्री.सतीश कल्याणकर (कनिष्ठ लिपिक)श्रीमती. पार्वती वाघमारे, श्री.सचिन ठाकूर,इ.उपस्थित होते.