
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी माॅल, किराणा तसेच स्वस्त धान्य दुकानातून वाईन विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे किंवा तशी घोषणा केली आहे ,त्याबद्दल लासुरस्टेशन ता.गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने अभिनंदन व धन्यवाद करणारा इमेल किसान करणी सेना कृषी व यांञीकी सेलचे जिल्हा अध्यक्ष इंजी महेशभाई गुजर यांनी दि २८ जानेवारी २०२२ रोजी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केला आहे यात इमेल द्वारे लासुरस्टेशन परिसरात फळे व धान्यापासून मद्य किवा वाईन तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
लासुरस्टेशन परिसरात फळांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.प्रामुख्याने मोसंबी,सिताफळ,पेरू,चिकु,पपई,अंजीर,दाळींब व केळी या फळांचा समावेश आहे.परंतु जवळ चांगली बाजारपेठ उपलब्ध नसल्याने माल व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करतात त्यामुळे फळबागा धारक शेतकर्याचे दरवर्षी नुकसान होत असते तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेली फळे फेकुन द्यावी लागतात.मागील दोन वर्षांपासून पिक विमा मिळाला नसल्याने अनेक बागा तोडण्याच्या मनस्तीती शेतकरी आला असताना, पोखरा व कृषी योजने अंतर्गत हजारो हेक्टर जमीनीवर फळबागांची लागवड २०२०-२०२१ या सालात झाली आहेत त्यामुळे फळाचे उत्पादन दुप्पट होणार आहे.
मा.मुख्यमंत्री यांनी वाईन विक्रीची घोषणा हि फळे उत्पादक शेतकरी हिताची आहे कारण जर आपण फळापासून तयार होणार्या वाईनला माॅल,किराणा तसेच स्वस्त धान्य दुकानाद्वारे विक्री करण्यास परवानगी देणार असाल तर आपल्याला प्रथम फळापासून तयार होणारी वाईन निर्मीती प्रकल्पाला परवानगी देणे किवा त्या सुरू करणे गरजेचे आहे कारण मागणी तसा पुरवठा दिल्यानंतर वाईन विक्रीतून राज्याला आवश्यक महसुल उपलब्ध होणार आहे.
लासुरस्टेशन परिसरात मोठ्याप्रमाणात शासकीय तसेच खाजगी जागा उपलब्ध आहेत.
लासुरस्टेशन परिसरात समृद्धी महामार्ग, सोलापूर धुळे महामार्ग, नागपुर मुंबई महामार्ग, औरंगाबाद पुणे महामार्ग, मालेगाव बिड महामार्ग व दौलताबाद रेल्वे पोर्ट तसेच संपुर्ण देशात कुठेही पुरवठा करता येईल अशी साधने,कच्चा माल,पाणी, कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठा फळे, धान्यापासून वाईन किवा मद्य निर्मीती करणारा कारखाना नक्की सुरू होऊ शकतो यात शंका नाही. येणाऱ्या काळात राज्य सरकारने लासुरस्टेशन परिसरात फळापासून वाईन किवा मद्य निर्मीती करण्यासाठी शेतकर्यांना,गटाना किवा वयक्तिक परवानगी देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.अशी विनंती इंजी महेशभाई गुजर जिल्हा अध्यक्ष किसान करणी सेना कृषी व यांञीकी सेल यांनी केली आहे.