
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
यानभुरे जयवंत
कंधार :- मराठी माणूस मोठा झाला की, मराठी भाषा मोठी होते.मराठी माणूस नोकर होण्यातच धन्यता मानतो,तो नोकरी देणारा उद्योजक झाला पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.डॉ. शंकर विभुते यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता.कंधार संचलित, श्री शिवाजी ज्यूनिअर कॉलेज माणिकनगर येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा खूप लवचिक आहे,शब्दांचे अर्थ ताबडतोब बदलतात. मराठी माणसाने न्यूनगंड न बाळगता आपल्या कर्तृत्वाने मराठी भाषेचे महत्त्व उंचावले पाहिजे.
आमची शाखा कुठेही नाही या खोट्या मोठेपणात व भ्रमात तो राहू नये.मराठी भाषा ही अस्मितेचा विषय नसून अस्तित्वाचा विषय आहे, असे ते याप्रसंगी म्हणाले.कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या “मा.आमदार गणपतराव” या ग्रामीण विनोदी कथेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.सुधीर कुरूडे यांनी कोरोना काळातील दोन वर्षांच्या संकटानंतर प्रथमच आपण या अतिशय चांगल्या व्याख्यानाचा लाभ घेतला आहे, हे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांनी तत्कालिन प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्थेचे संस्थापक-संचालक, ज्येष्ठ स्वातंञ्य सेनानी,माजी खासदार, आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब व संस्था सचिव स्वातंञ्य सेनानी, माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे साहेब व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील,तळागाळातील,नाहिरेवाल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली हा इतिहास विशद केला. पाहुण्यांचा परिचय प्रा.स्वाती कान्हेगावकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधव ब्याळे यांनी तर आभार प्रा.कैलास पतंगे यांनी केले.कार्यक्रमाची सुरूवात वंदेमातरम् गीताने व संगीतमय(ढोल वाजवून) राष्ट्र गानाने सांगता करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळून संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परीक्षा विभाग प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड,प्रा.वसंत राठोड, प्रा.सौ. दिपा जामकर,प्रा.अमर दहिवडे,प्रा.विक्रम लुंगारे,प्रा.जयवंत यानभूरे, प्रा.कपिल सोनकांबळे,प्रा.सौ.प्रतिभा जाधव,प्रा.निलेश मोरेश्वर, प्रा.सौ. रूपाली कळसकर,प्रा.सौ.रत्नमाला नवघरे,प्रा.सौ.वैशाली दुलेवाड,प्रा.डॉ.रेशमा शेख,प्रा .सौ.शिल्पा पारेकर,प्रा.शिवानंद सोनटक्के,प्रशांत कुरूडे,बालाजी निरपणे,समर्थ लोखंडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.