दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहराचा मागील दहा वर्षाचा बॅगलाग भरून तीन वर्षात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केले आहेत असे प्रतिपादन लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले आहे. लोहा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांचा सत्कार व चहा फराळाचा कार्यक्रम त्यांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपाध्यक्ष शरद पाटील पवार ज्येष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले गटनेते करीम शेख, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण, नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक नारायण येलरवाड, माधवराव पाटील फाजगे, यशपाल निर्मले,लकी फुलवरे, राजू नाकेलकर, विनय चटलवाड, आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवाचा पुष्पहार व दस्ती टोपी घालून भव्य सत्कार केला व नंतर चहा पाणी फराळ करून विशेष भेट वस्तू देण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, लोहा शहराचा विकास मागील १० वर्षापासून खुंटला होता आमचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या ३ वर्षाच्या कालावधीत लोहा शहरात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत व आणखी दोन वर्षांत अनेक विकास कामे करुत लोहा सर्वच वार्डातील जनतेनी मला भरभरुन मतदान केले आहे.
लोहा शहरात सर्वच वार्डात विकास कामे सुरू आहेत व यानंतर ही दोन वर्षांत सभागृहातील सर्व १९ नगरसेवकांना सोबत घेऊन विकास कामे होत आहेत असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले. यावेळी लोहयातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे यांनी केले तसेच यावेळी पत्रकार डी.एन. कांबळे, साहेबराव सोनकांबळे यांची ही भाषणे झाली शेवटी आभार पत्रकार शेख मुर्तुजा यांनी मानले.