
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी सिडको
नांदेड दि 29 :- आत्मप्रकटीकरणातूनच भाषेचा जन्म झाला. आज जगात सहा हजाराहून अधिक भाषा बोलल्या जातात. त्यातील काही भाषा उपयोजना अभावी मृत झालेल्या आहेत. भाषेचे मरण हे संस्कृतीचे मरण असते, म्हणून संस्कृती टिकवून समाजाच्या उत्कर्षासाठी भाषेचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ समारोप समारंभ घेण्यात आला.’मराठी भाषा काल आणि आज’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमधे डॉ. केशव सखाराम देशमुख बोलत होते . यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कर्म. आ. मा. पाटील महाविद्यालय पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश मस्के यांनी मराठी भाषेची कालची व आजची स्थिती यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. मराठी भाषेवरील वर्तमान काळातील इतर भाषांची आक्रमणे सोदाहरण स्पष्ट करून भाषा ही मानवाचा प्राणवायू आहे, हा प्राणवायू टिकविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण माणूस करीत असतो, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी अनेक संदर्भ देत मराठी भाषा संवर्धनासाठी शासनाने स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केलेला आहे. त्या विभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या राज्यस्तरीय वेबिनारसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.दीपक बच्चेवार, विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे सहायक अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ.हनुमंत भोपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. वैजयंती कस्तुरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. लालबा खरात आणि डॉ.शोभा वाळूककर यांनी करून दिला. या वेबिनारची तांत्रिक बाजू उत्कृष्टपणे सांभाळत उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील डॉ. प्रदिप बिरादार,डॉ. एस.व्ही.शेटे, प्रा. डॉ. नागेश कांबळे, डॉ. व्ही.व्ही.मोरे, डॉ.आर.एम.कागणे, डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ.उत्तम कानवटे, डॉ. ललिता अय्या यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वसंतराव नाईक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासक आणि मराठी भाषाप्रेमींनी ऑनलाईन लाभ घेतला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने वेबिनारची सांगता झाली.