
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
नंदुरबार :- अनुदानीत खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक पीएच. डी. धारक शिक्षकांची वर्ग एक व दोन पदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील विद्यावाचस्पती संघर्ष समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक पीएच.डी.धारक शिक्षक आहेत. शासनाच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय वर्ग १ व वर्ग २ ही पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत शासनाकडून ही पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा माहीती मागवण्यात आली आहे .
नुकतेच १ जानेवारी २०२२ च्या शासन आदेशानूसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नेट,सेट तसेच पीएच.डी. धारक प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागातील प्रशासकिय वर्ग १/वर्ग २,गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय या पदांवर सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्रता धारक शिक्षकांची माहीती देखिल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे; परंतू याच बरोबर खाजगी शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांप्रति दुजाभाव दाखविण्यात आला आहे.
वास्तविक पाहता अनेक माध्यमिक विद्यालयात पीएच.डी. व नेट/सेट धारक शिक्षक आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले अध्यापनाचे कार्य सांभाळून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च विद्यावाचस्पती उच्च शिक्षण अहर्ता प्राप्त केली आहे. शासनाच्या सापत्न धोरणामुळे यांची पदवी निरर्थक ठरून शिक्षकांच्या मनात वैफल्यग्रस्त भावना निर्माण होत आहे तसे पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्या शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त करून सुध्दा अशा शिक्षकांना पदोन्नतीच्या कुठल्याच संधी नसतात.तरीही ब-याच शिक्षकांनी कलि, विज्ञान , वाणिज्य व क्रिडा अशा विविध शाखेतून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे .
या पदांवर पीएच.धारक शिक्षकांची नियुक्ती केल्यास त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी व नविन संकल्पना राबविण्यासाठी होऊ शकतो.पुर्वी ही पदे प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांच्यामधून भरली जात होती मग आताच का माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांप्रती हा दुजाभाव का ? अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे.शिक्षण विभागातील प्रशासकिय वर्ग १ व वर्ग २ या पदांवर जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षकांसोबतच खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक पीएच.डी.धारक शिक्षकांची नेमणूक केल्यास शिक्षण क्षेत्रात उच्च अहर्ता धारक अधिकारी असतील.
त्यामुळे निकोप व उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था उदयास येईल म्हणुन शैक्षणिक व्यवस्थेविषयी तळमळ असणाऱ्या व शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनीधींनी यावर ठोस प्रयत्न करावे तसेच शिक्षण मंत्र्यांनी सुध्दा पीएच.डी.धारक शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रसिध्द पत्रकाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यावाचस्पती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य डॉ.अंजली महाजन (शहादा), डॉ.डी.डी.पटेल,(शहादा ) डॉ. दिपक शेंडे (सोमावल) ,डॉ.जे. के.वळवी (वाण्याविहीर) ,डॉ.संध्या पटेल ( अक्कलकुवा ) आदींनी केली आहे.
प्रतिक्रिया -डॉ.जे.के.वळवी
शिक्षण विभागातील प्रशासकिय वर्ग १ व वर्ग २ या पदांवर जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षकांसोबतच खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक पीएच.डी.धारक शिक्षकांची नेमणूक केल्यास शिक्षण क्षेत्रात उच्च अहर्ता धारक अधिकारी असतील त्यामुळे निकोप व उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था उदयास येईल म्हणुन शैक्षणिक व्यवस्थेविषयी तळमळ असणाऱ्या व शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनीधींनी यावर ठोस प्रयत्न करावे तसेच शिक्षण मंत्र्यांनी सुध्दा पीएच.डी.धारक शिक्षकांना न्याय द्यावा.