
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- मुंबईसह राज्यातील एकूण २० महापालिकांमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे . मात्र , नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या ऐतिहासिक औरंगाबाद महापालिकेची निवडणूक घेता येणार नाही . जानेवारी २०२० मध्ये राज्य निवडणूक आयोगाने टाकलेल्या आरक्षणास आणि वॉर्ड रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकेचा निकाल लागलेला नाही . त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय नेते सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद खंडपीठात महापालिका आणि नगरपालिका मधील नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या प्रक्रियेला आव्हान दिले आहे .
म.न.पा. चा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपला . कार्यकाळ संपला तेव्हा कोरोनीची पहिला लाट होती . त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली . यामध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केली , प्रगणक गट फोडण्यात आले , काही विशिष्ट राजकीय मंडळींसाठी वॉर्ड तयार करण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला . याचिकेवर अनेकदा सुनावणी घेण्यात आली अद्याप मात्र अंतिम सुनावणी झालेली नाही .
आता ३ मार्च रोजी याचिकेवर सुनावणी असल्याचे बोलले जात आहे . ही संगणकाद्वारे जनरेट होणारी तारीख आहे . त्यादिवशी प्रकरण बोर्डावर येईल असे नाही . राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कायद्यात बदल झाला आता प्रभाग पद्धत अमलात आणत आहोत असे शपथपत्र आधारे कळविले आहे . मात्र जोपर्यंत या याचिकेचा निकाल येत नाही तोपर्यंत मनपाची निवडणूकच घेता येत नाही हे स्पष्ट झाले आहे .