
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- दहावी आणि बारावी च्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात या मागणीसाठी आज राज्यभरातील विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे . मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही आज ही मागणी लावून धरली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे . तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत जाहीर करण्यात आली आहे .
या दोन्ही वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं शक्य नसल्याचं शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे . मात्र यंदाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने न घेता ऑनलाइन पद्धतीनेच घ्याव्यात , या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत . औरंगाबाद आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली .
औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं –
औरंगाबाद मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला . यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली . कोरोना संकटामुळे या वर्षी शाळा अनियमित झाल्या. तिसऱ्या लाटेनंतर आता कुठे शाळा सुरु होत आहेत , त्यातच पुढील महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे . या वर्षीच्या परीक्षा एक तर पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात , अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली .