
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
अहमदाबाद :- भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये येत्या सहा फेब्रुवारीपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिन्ही वनडे मॅचेस होणार आहेत. रविवारी वेस्टइंडिज विरुद्ध होणारा पहिला वनडे सामना भारतासाठी अनेक अंगांनी खास आहे. कारण भारताचा हा 1000 वा वनडे सामना आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ आहे. पण त्याचवेळी प्रेक्षकांसाठी एक निराश करणारी बातमी आहे.
खरंतर हा क्षण प्रेक्षकांसाठीही खास होता. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून या क्षणाचं साक्षीदार बनायला आवडलं असतं. पण कोरोनामुळे गुजरात क्रिकेट असोशिएशनने बंद दाराआड क्रिकेट सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नसणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षता घेता, सर्व सामने बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय घेतलाय, असे गुजरात क्रिकेट असोशिएशनकडून सांगण्यात आले.
याउलट स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थिती संदर्भात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टी-20 सीरीजच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 16 फेब्रुवारीपासून इडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
ममता बॅनर्जी सरकारने वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इडन गार्डन्स स्टेडियमवर 75 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिली आहे.