
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- मुंबईतील किंवा पुण्याजवळील अनेक जण पुणे फिरण्याचा प्लॅन बनवतात. अवघ्या एक ते दोन दिवसांत फिरता येण्यासारखे हे शहर ऐतिहासिक वारसा जपणारे आहे.
जवळपास दीड-दोन वर्षे आपण घरातच लॉकडाऊन झालो होतो. आता कोरोनाचे नियम काहीसे शिथिल झाल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. कोरोनाची धास्ती अजूनही आपल्या मनात कायम आहे.
मास्क, सॅनिटायझर सतत सोबत बाळगत आपण आपली दैनंदिन कामे पूर्ण करत आहोत. तर, आता घरात बसून कंटाळलेले अनेक लोक बाहेर फिरण्याचे प्लॅन देखील बनवत आहेत.
कोरोनाचा विचार करून बरेच लोक जवळपासच्या भागात फिरण्याची योजना आखत आहे. प्रवासासाठी उत्तम आणि सुरक्षित अशा जवळच्या ठिकाणांना अधिक पसंती दिली जात आहे.
मुंबईतील किंवा पुण्याजवळील अनेक जण पुणे फिरण्याचा प्लॅन बनवतात. अवघ्या एक ते दोन दिवसांत फिरता येण्यासारखे हे शहर ऐतिहासिक वारसा जपणारे आहे. तुम्ही देखील पुण्यात फिरण्याचा प्लॅन बनवत असाल, तर ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका!
शनिवारवाडा–
पहिले बाजीराव पेशवे यांनी 1736मध्ये 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच ‘शनिवार वाडा’ बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य वास्तव्य ठिकाण होते. हा भव्य वाडा पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा आहे. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
सिंहगड–
‘गड आला पण सिंह गेला…’ असा इतिहास सांगणारा सिंहगड! पुर्वी ‘कोंढाणा’ या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. छत्रपती शिवाजी महराजांचे विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघलांशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ‘गड आला पण सिंह गेला’ त्यानंतर त्यांनी ‘कोंढाणा’ किल्ल्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ असे ठेवले.
पर्वती–
पर्वती हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. पर्वती नावाची ही टेकडी शहराच्या दक्षिणेकडील भागात असली, तरी ती पुण्याच्या जवळजवळ प्रत्येक भागातून दिसते. पर्वती आणि देवदेश्वराला समर्पित मंदिराकडे जाणाऱ्या 108 पायऱ्या आहेत. या टेकडीवरून पुण्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे अलौकिक दर्शन या टेकडीवरून होते.
आगाखान पॅलेस–
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेवर अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले आहे.