
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
राम पाटील क्षीरसागर
डॉ. अर्चना सावंत यांचे ‘आई होण्याची गोष्ट’ हे पुस्तक हातात पडले.सहज चाळत गेलो.पहिल्या पानापासून या पुस्तकाची पकड शेवटपर्यंत कायम राहिली.अलीकडे अशी पुस्तके खूप कमी दिसतात. मुख्य म्हणजे अर्चना सावंत ही कोणी सिध्दहस्त वगैरे लेखिका नाही. मला वाटते म्हणूनच या लेखिकेचे लेखन मनाला सहज स्पर्श करते.या लेखनात कुठेही कलाकुसर नाही. कल्पनेच्या भरा-या नाहीत.अत्यंत प्रांजळपणे ही लेखिका व्यक्त होत जाते.
आपल्या लग्नापासून अपत्य प्राप्तीपर्यंतचा प्रवास मांडत जाते.
म्हटलं तर लेखिकेच्या आयुष्याच्या एका छोट्याशा टप्प्यावरचा हा प्रवास आहे.या टप्प्यात लेखिकेने जे जीवन जगलेले आहे ते कसलाही आडपडदा न ठेवता मांडलेले आहे.मुलगी म्हणून बालवयात जे संस्कार केले जातात ते संस्कार अर्चनावर फारसे झालेले नाहीत. मुलीने मर्यादेत राहिले पाहिजे, काही मुभा स्वतःहून अव्हेरल्या पाहिजेत ही शिकवणूक आपल्या पाल्याकडून आपणाला मिळाली नाही. अशी लेखिकेची प्रांजळ खंत आहे.त्याचे कारणही तसेच आहे.आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांच्या वेळा बांधलेल्या.
ठराविक वेळी शाळेला जाणं आणि शाळा सुटल्यावर परतणं असा दिनक्रम.त्यामुळे इतर मुलांसारखं शाळेतून आलेल्या लेकराची वाट पाहाणं नाही,हसतमुखानं स्वागत करणं नाही.आपल्या वाट्याला अशा कौतुक भरल्या गोष्टी आल्या नाहीत. याचा लेखिकेला खेद आहे.याच कारणामुळे इतर मुलींसारखी आपली घडण झालेली नाही. मुलगी म्हणून संकोच,भिडस्तपणा,बुजरेपणा ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वात न येता काहीसा मुलासारखा बेडरपणा आला असल्याचे लेखिका सांगते.अर्थात याचा दोष ती आई वडिलांना देत नाही. व्यवस्थेनेच तिच्या वाट्याला ही परिस्थिती आणलेली आहे असे समजून ती वागते.
लेखिका अर्चना सावंत आपल्या लग्नाविषयी,पती आणि सासरच्या लोकांविषयी कसलाही आडपडदा न ठेवता लिहिते. एमपीएससी परीक्षेच्या निमित्तानं पुण्यात तयारी करण्यासाठी गेलेली अर्चना तिच्याच क्लासमध्ये असलेल्या अमित सावंतशी कशी विवाहबद्ध होते हे सांगते.लेखिकेचे माहेर नांदेड आणि सासर रत्नागिरी. भौगोलिक अंतराच्या दृष्टीने माहेरपासून सासर लांब असलेलं.मराठवाडा आणि कोकण अशा भिन्न परिसरातील जगण्या वागण्याच्या पध्दती वेगळ्या.अशा परिस्थितीत आपण कसे जुळवून घेतले हे सांगत असताना आपला भाऊ,बाबा,आई जसे आपणाला जीव लावत तसाच नवरा,सासू,सासरे ही सारी सासरची माणसं प्रेम करणारी भेटली असं नमूद करते.
लग्न झाल्यानंतर कुठल्याही मुलीचं स्वप्न असतं ते आपणाला मूल झालं पाहिजे असं.लेखिकेला सुध्दा असं वाटणं स्वाभाविक आहे.परंतु एक अनामिक भीती तिच्या मनात असते.आपली मासिक पाळी नियमित नाही. त्यामुळे आपणाला गर्भधारणा होणार की नाही याविषयी ती साशंक असते.योगा,पंचकर्म हे सारे करूनही डोळ्यासमोरचा काळोख कमी होत नव्हता. परंतु लेखिकेने निर्धार केलेला होता की मी कुठल्याही परिस्थितीत आई होणारच.पाळी नियमित व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार,खाणपान आणि एकूणच जीवनशैली बदलण्याची लेखिकेची तयारी. या सा-या गोष्टींचा सकारात्मक परिणाम दिसतो.अर्चना गरोदर रहाते.परंतु आपल्या करिअरचं काय.
आपण आणि आपला नवरा अद्याप स्थीर झालो नाही. मग काय करायचे?अबॉर्शन करावे का?अशा प्रश्नांचा जीवघेणा खेळ मनात सुरू होतो.प्रचंड मानसिक ताणाखाली लेखिका वावरत असते.त्याचा परिणाम तिचं नैसर्गिक अबॉर्शन होते.या घटनेमुळे लेखिका मानसिकदृष्ट्या खचून जाते.शून्य,सुप्तावस्थेत जाते.आपले मूल जगू शकणार नाही असे तिला उगाचच वाटते.एखाद्या वेदनादायी घटनेतून माणूस स्वतः सावरू शकतो.परंतु आजूबाजूचे लोक त्याला सावरू देत नाहीत.माझ्या बाळाचे कसे झाले, काय झाले असे प्रश्न विचारून नातेवाईक भंडावून सोडू लागले.अशा परिस्थितीत आपला भाऊ ही आपलं मन मोकळं करण्यासाठी हक्काची जागा होती असे लेखिका लिहिते.
जेव्हा कुठल्याच प्रश्नांची नीट उत्तरं आपल्या बाजूने येत नाहीत तेव्हा देव,नवस अशा गोष्टी पुढे येतात. मला मूल व्हावं,मी आई व्हावं म्हणून नवस करायला हवा असं काहीजण म्हणाले.तेव्हा मी हिंदू, मुस्लीम, शिख अशा मिळेल त्या धर्मातील देवाला नवस केले. नवस केल्याने मूल होत नसते,हे अवैज्ञानिक आहे हे माहित असूनही माझ्या कमकुवत मनाला हाच आधार वाटत होता.नवस हा प्रकार मला मुळीच पटण्यासारखा नव्हता असे सांगून ही एक अंधश्रद्धा असल्याचे लेखिका म्हणते.आपणाला मूल व्हावे म्हणून केलेल्या या उपाय योजना अघोरी आहेत,हे लेखिका जाणून होती.याच काळात ज्योतिषशास्त्र हे काय आहे ते मला कळले.
कुंडली जुळली तरच लग्न टरायले हवे अन्यथा संसारात खूप अडचणी आणि संकटे येतात,असे सांगितले जाते. परंतु ‘कुंडली जुळो न जुळो मी तुझ्याशीच लग्न करणार’ हा लेखिकेच्या पतीचा,अमितचा निर्धार खूप आश्वासक होता.त्यामुळे तुमच्या कुंडलीत एकच मूल आहे,संततीप्राप्ती उशिरा आहे,संतानदोष आहे हे सारे प्रवाद लेखिका कानाआड करीत होती.पत्रिका, ग्रह याचे थोतांड मांडू नका.शास्र चांगले असले तरी शास्राच्या नावावर चालणारी बुवाबाजी ही एक प्रकारची भोंदूगिरी असते असे लेखिकेला वाटते.
लेखिकेचे बाळाची आई होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत असताना पुन्हा एकदा आघात होतो.जुळी मुले जन्माला येऊनही वाचत नाहीत.लेखिका आत्मग्लानीत जाते.सतत हे का घडते आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
सासू-सास-यांचा रागात कधीअपमान केला म्हणून,पालीचे पिल्ले मारले म्हणून, आई-बाबांना त्रास दिला म्हणून.. ही संकटं आपल्यावर येत आहेत अशा चित्र विचित्र प्रश्नांभोवती लेखिकेचे मन भरकटत जाते. खूप सारे डॉक्टर होतात.आई होण्यासाठी लेखिका आपलं आईपण पणाला लावते.दरम्यान विचार करून करून निद्रानाश, बेचैनी, चिडचिडेपणा यायला लागतो.मध्ये काही काळ अमितशी निर्माण झालेला दुरावा कमी होतो.संसारिक जीवनाची गेलेलीआठ वर्ष निघून गेलेली असतात. मूलाचे स्वप्न अमूर्तच रहाते.मध्येच कोणी टेस्टट्यूब बेबी तर कोणी दत्तक मुलाचा प्रस्ताव देत असतात.
लेखिका मात्र खचत नाही. सकारात्मक पध्दतीने जगण्याकडे पाहायला हवे,ही धारणा भक्कम करीत असते.वैद्यकीय उपचाराने आपणास नक्की अपत्य प्राप्ती होऊ शकते हा गाढा आत्मविश्वास लेखिकेचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण करतो. एका गोड मुलाची आई म्हणून लेखिका आयुष्यातील अत्युच्च आनंद अनुभवते.
आई होण्याची गोष्ट या पुस्तकात डॉ. अर्चना सावंत यांनी आपल्या विवाहानंतरच्या आयुष्यातील सुखदुःखाचे प्रसंग निसंकोचपणे सांगितले आहेत.जे लोक संततीसाठी धडपडत असतात त्यांना कोणकोणते अडथळे येत असतात. त्यांची मानसिकता कशी असते.लग्न झाल्यानंतर मूल का होत नाही म्हणून स्रीची समाजाकडून केली जाणारी हेटाळणी, अनाठायी झडणा-या चर्चा, तर्कवितर्क या सर्व बाबींवर लेखिकेने या आत्मकथनातून प्रकाश टाकलेला आहे.
आई होण्यासाठी आतूर असलेल्या स्रीच्या मनाची दालने या आत्मकथनातून खुली झालेली आहेत.अत्यंत प्रवाही भाषा आणि कसल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता झालेली अभिव्यक्ती ही या आत्मकथनाची दमदार बाजू आहे.वंधत्वाची सल कशी असते आणि त्यासाठी योग्य निदान आणि उपचार हे किती गरजेचे असतात हे जसे पुस्तक वाचताना उकलत जाते तसेच समाजातील अंधश्रद्धा, रूढी,परंपरा यापेक्षा मनातील सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे नेमकेपणाने अधोरेखित करणारे हे आत्मकथन आहे.आई होण्याची इच्छा असलेल्या कोणाही स्रीने हे पुस्तक वाचायलाच हवे.तसेच आईपण ही किरकोळ गोष्ट नसते हे समजून घेण्यासाठी कोणाही पुरूषाने हे आत्मकथन जरूर वाचायलाच हवे.
एका आईचा हा अटीतटीचा प्रवास आहे.हा प्रवास खूप धीटाईने मांडलेला आहे.अलीकडच्या काळात इतक्या धीटपणे स्वतःला मांडत जाणारे लेखन अभावानेण दिसून येते.आई होण्याची लेखिकेची गोष्ट सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते.अशी वाचनीयता या आत्मकथनाने निश्चितच कमावलेली आहे.या पुस्तकाला संतोष घोंगडे यांचे समर्पक मुखपृष्ठ असून नांदेडच्या निर्मल प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरुपात हे पुस्तक प्रकाशनासाठी सिध्द केले आहे.लेखिकेच्या साहित्य प्रवासास हार्दिक शुभेच्छा!
डॉ. जगदीश कदम
नांदेड
भ्र.९४२२८७१४३२