
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
” सुरक्षित प्रवास सुखाचा प्रवास”
या बोध वाक्यावर चालणारी लालपरी आज तीन महिन्यापासून रुसली आहे का? सर्वांनी थोडासा विचार करा मायबाप आज हे कंत्राटी कर्मचारी नियमबाह्य ट्रेनिंग असलेले प्रवाशांच्या आयुष्याशी खेळत आहेत ,आज पाहिलं तर कितीतरी अपघात होत आहेत याचं हेच नियमबाह्य चालक आहेत आणि आपण शांत पाहतोय ,उठा सर्वजण सरकारला जाब विचारा आणि आपल्या लालपरीला वाचवण्याचा प्रयत्न करा. एस.टी.म्हंटल कि सर्वसामान्य जनतेची लालपरी जिथ कोण पोहचत नाही तिथ ऊन, वारा,पाऊस, रात्र याचा विचार न करता एसटी मात्र पोहोचते आणि तिच्याबरोबर माणसंदेखील. ज्या वेळेस पक्का रस्ता नव्हता. त्या वेळीसुद्धा एसटी खेड्यापर्यंत पळत होती. डोंगर कपाऱ्यातून,जंगलातून, अगदी शेवटच्या टोकापर्यंत धावत होती. अजूनही धावते.
या एसटीत बसत कोण…?? कष्टकरी, मजूर, शेतकरी, कामगार,गरीब, विद्यार्थी,वयोवृद्ध आणि ज्यांना एसटीवर विश्वास आहे, ते लोक. खरंतर संविधानाने समतेचा, एकतेचा, एकात्मतेचा संदेश दिला आहे,तो परिपूर्ण करण्यात जी यशस्वी ठरली आहे, ती म्हणजे एसटी. कारण कोणत्याही धर्माचा, वर्णाचा, जातीचा, वर्गाचा, स्त्री-पुरुष, तृतीयपंथी, असा भेदभाव न करता सर्वांना एकत्र सामावून घेऊन लांब पल्ल्यावर आणि खेड्यापाड्यात पोचणारी एसटी म्हणजे तुमची आमची लालपरी.आणि ती जबाबदारी पार पाडत आहेत, एसटीचे कर्मचारी, तुमच्या आमच्या भाषेत ड्रायव्हर आणि कंडक्टर अन् आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आलीआहे गेली तीन महिने संप सुरू आहे लालपरी आपल्या जागेवर उभी आहे. तिच्याबरोबर कर्मचारी सुद्धा,आपल्या हक्कासाठी उभे आहेत.
पण जर विचार केला, तर त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद देखील झाले आहेत. एसटी स्टँड वर गेल्यानंतर एसटी आल्यानंतर तिच्या भोवती वडापाव, गारपाणी, काकडी, भडंग, कंदी पेढे, असे आवाज देणारे देखील आता गायब झाले आहेत. छोटे-मोठे टपरीवाले,यांचा देखील धंदा बसला आहे.आणि अनाथ,बेवारस, वृद्ध माणसे, एसटी येईल, माणसे उतरतील कोणीतरी रुपया दोन रुपये देईल या आशेवर अजून बसले आहेत. ज्यांचा प्रवास खर्च हजारांचा होतो आणि मात्र एसटी मुळे मात्र तोच खर्च आठशे रुपयात पासामुळे वाचतो आणि राहिलेले दोनशे रुपये त्यांची बचत होते, असे लोक देखील एसटीची वाट बघत आहेत. सकाळची एसटी संध्याकाळी नक्कीच आम्हाला घरी घेऊन जाईल. या आशेवर असणारे ग्रामीण भागातील लोक सुद्धा एसटी चालू होईल याकडे डोळे लावून आहेत.
मुक्कामाच्या प्रवासाला निघालेली एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर आपला बोजाबिस्तारा बांधून मुक्कामाच्या गावाला शेवटचा नेहमीचा प्रवाशी येईपर्यंत वाट बघतात, आणि तो आल्यानंतरच निघतात. संध्याकाळी हॉटेलमधून पार्सल आणलेलं आणि शिल्लक राहीलेला डबाच खातात अन् संध्याकाळची जमा झालेली कॅश उराशी बाळगून शंभर जणांनी तुडवलेल्या एसटीच्या सीट खाली आपलं अंग टाकून देतात आणि सकाळी तोंडावर पाणी मारून, कामगार, कष्टकरी, मजूर,यांना कामावर अन शाळेतील पोरांना,शाळेत वेळेवर पोचण्यासाठी चहाचा घोट न घेता गडबड करतात आणि सर्वांना वेळेच्या पाच दहा मिनिट माग पुढ का होईना बरोबर पोचवतात.
सणावाराला सगळ्यांनी एकत्र सन साजरे करावे, एकमेकांच्या उत्सवात सामील व्हावे, म्हणून जादा सुविधा एसटी कर्मचारी देतात आणि त्यांना तेलाच्या डब्याच्या किमंतीचा सुद्धा बोनस मिळत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. एसटीने प्रवास करणारे मोठे झाले, आमदार झाले. पण एसटी वाले आणि घरचे खरचा वाचून तसेच राहिले.
खरंतर एसटी म्हणजे, ग्रामीण भागाची शान आणि जान आहे. हिरव्या गर्द झाडीमधून धावणारी लालपरी आहे. औद्योगिक क्रांतीचे प्रतीक आहे. एसटी म्हणजे गाव आणि शहर यांचा दुवा आहे. एसटी म्हणजे विकास प्रगतीचा मार्ग आहे.
एसटी म्हणजे, कामगारांचा, कष्टकऱ्यांचा,मजुरांचा, शहरातील मोठमोठ्या कंपन्यांना मोठे करण्यासाठी आणि कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा साकव आहे.एसटी म्हणजे नेकीचे दुसरे नाव एकी आहे.
(एसटी कर्मचारी जगवा. तरच कामगार, कष्टकरी,मजूर, जगेल.)