
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
हलगरा :- ता. निलंगा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष व ०२ फेब्रुवारी जगद्गुरु तुकोबाराय जयंती आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्ताने डॉ. शिवाजीराव पाटील विद्यालय हलगरा ता.निलंगा जि.लातूर येथे श्रीमती चंद्रभागा पाटील गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती जाधव आदित्य तानाजी हलगरा, (दहावी गुण ९९.२०%) ५०,००० पुरस्कार, गायकवाड मैथिली बालाजी हलगरा,( दहावी गुण ९७.२०% ) ५००० पुरस्कार, सरबान अब्दुल महताब हलगरा, (दहावी गुण ९१.६०%) ५००० पुरस्कार या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला.
औराद शहाजानीसारख्या ग्रामीण भागातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डिजिटल रुरल कनेक्ट या ग्रुपच्यावतीने समर्पण पुरस्कार मा. बालाजी जाधव (मुख्याध्यापक जि.प.शा., उजेड व महासचिव जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र)
युवारत्न पुरस्कार मा. अनंत चपाई माधवराव कदम
(वाचक चळवळीचे प्रणेते,उदगीर), वाग्यज्ञ पुरस्कार प्रा. डॉ.ज्ञानदेव नेमाजी राऊत (शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी) यांना देण्यात आला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना तहसीलदार गणेश जाधव साहेब यांनी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याने अभ्यास आणि अभ्यासच केला पाहिजे, जीवनाच्या क्षेत्रात ध्येय ठेवून पूर्ण समर्पित भावनेने उतरल्यास जीवनामध्ये यश हमखास मिळते, असा स्पर्धा परीक्षेचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी आपली ओळख स्वतःच्या बापाच्या किंवा आडनावाच्या नावाने निर्माण करु नये यासाठी त्यांनी स्वतःची ओळख स्वतःच्या कार्य कर्तुत्वाने निर्माण केली पाहिजे. आजचे युग हे स्पर्धेचे व कार्यकर्तृत्वाचे आहे असा सल्लाही त्यांनी दिला.
याप्रसंगी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे औरंगाबाद विभागाचे कोषाध्यक्ष डी.बी. बरमदे यांनी जगद्गुरू तुकोबाराय यांच्या जयंतीनिमित्याने त्यांच्या जीवन कार्याचा परिचय देऊन विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य रमेश मदरसे यांनी शिष्यवृत्ती व पुरस्कार हे विद्यार्थ्यांच्या पाठीवरची शाबासकीची थाप असते. यातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उजाळा मिळतो. त्यातून विद्यार्थ्याचे जीवन घडते अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.
अमेरिकेच्या याहू कंपनीत संचालक असलेले हलगरा नगरीचे सुपुत्र दत्ता पाटील यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर उदगीरचे कवी अनंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन संपन्न झाले. ‘या लातूर जिल्ह्याला’ ही भारदार कविता गाऊन प्रताप जाधव सरांनी संमेलनात रंगत भरली. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचे प्रदेश संघटक- कवी सतीश हाणेगाव यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करताना ‘भ’भाकरीची ही कविता सादर करून प्रत्येकाला विचार करायला भाग पाडले.
कवयत्री शांभवी जावळीकर,लक्ष्मी बंडगर यांनीही आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. उजळणी व ती या अनंत कदम यांच्या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी संतोष स्वामी, चंद्रभागा पाटील, सरपंच मंगलबाई पाटील, माजी सभापती देवदत्त पाटील, व्यंकटराव पाटील, दिलीप दापके, डीआरसीचे बालाजी पाटील,अजय मोरे, प्रा. पवार, माजी सरपंच देशमुख, गोस्वामीसर शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, गावकरी या सर्वांची उपस्थिती होती.