
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- प्रसिद्ध टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिने राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि 1971 च्या भारत-पाक युद्धातील हवाईदल योद्धे निर्मल जीतसिंग सेखोन यांना आदरांजली वाहिली. सेखोन यांनी या ऐतिहासिक युद्धादरम्यान अतुलनीय धैर्य आणि निर्धार यांचे दर्शन घडवले होते. मनिका बत्रा हिने स्मारकातील ‘परम योद्धा स्थळ’ नावाच्या शौर्य दालनात श्रद्धांजली वाहिली , जिथे परमवीर चक्र प्राप्त करणाऱ्या एकूण 21 विरांमध्ये फ्लाइंग वॉर हिरो निर्मल जीतसिंग सेखोन यांचा अर्धपुतळा बसवला आहे.
“युद्ध आणि आपल्या सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल स्मारकावर कोरलेल्या उद्धरणांनी मी भारावून गेले आहे. एक भारतीय म्हणून माझे हृदय आज कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरले आहे,” असे या ऑलिम्पिक खेळाडूने म्हटले आहे. भव्य राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा यांच्या विद्यमान मांडणी आणि सममितीशी सुसंगत असलेल्या या स्मारकाला डिजिटल ओळख आहे , राष्ट्रीय युद्ध स्मारक ॲप्लिकेशनची निर्मिती आणि कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्यांना आभासी श्रद्धांजली वाहण्याची सोय असलेल्या स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत.
दुसरे युद्ध नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांना आभासी पद्धतीने श्रद्धांजली वाहताना, मनिका म्हणाली, “स्मारकाची वास्तुशिल्प रचना ज्या प्रकारे शहीदांना अमर बनवते, त्याचप्रमाणे मोबाइल ॲप-आधारित व्हर्च्युअल टूर गाइड आणि व्हर्च्युअल श्रद्धांजलीसाठी डिजिटल पॅनेल यासारख्या अद्ययावत डिजिटल सुविधांमुळे प्रत्येक नागरिकाला कुठूनही आदरांजली वाहता येईल. या खेळाडूने शूर शहीदांना श्रद्धांजली वाहणाऱ्या आणि स्मारकाला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘स्मरिका’ या अनोख्या स्मृतिचिन्ह विक्री करणाऱ्या दुकानाला देखील भेट दिली.