
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी नागरिकांना आता ‘ई-पासपोर्ट’ दिला जाणार असल्याची माहिती दिली होती.. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देशभरातील नागरिकांचे ‘ई-पासपोर्ट’ तयार केले जाणार आहेत. याबाबत नाशिक येथील ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघा’चे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “आतापर्यंत आम्ही चाचणीकरिता 20 हजार ‘ई-पासपोर्ट’ बनवून दिले आहेत. आता रोज 50 हजार ‘ई-पासपोर्ट’ तयार केले जातील. मार्च महिन्यात या कामाला सुरूवात होईल..”
विशेष म्हणजे, यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. आता ‘ई-पासपोर्ट’चा निर्णय झाल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले. त्यानुसार पुन्हा एकदा महत्त्वाच्या कामाची जबाबदारी नाशिकवर आली आहे.
असा असेल ‘ई-पासपोर्ट’!:-
‘ई-पासपोर्ट’मध्ये सुरक्षेला जास्त महत्त्व दिले असून, त्यातील कुठलीही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरीही सुरक्षित असेल. त्यासाठी त्यात विशेष चिप बसविण्यात येणार आहे. पासपोर्टसोबत कोणी छेडछाड केल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहचणार आहे.