
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली : भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकात 8 व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.
विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील इंग्लंड संघात सर व्हिव्हिएन रिचर्ड्स स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.00 वाजता सुरुवात होईल. भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकात 8 व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. यापुर्वी भारताने 7 वेळा 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना गाठला होता. यात 4 वेळा भारतीय संघाने विजेतेपद पटकावले असून, 3 वेळा भारतीय संघ उपविजेता ठरला आहे.
भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तर 2006, 2016 आणि 2020 ला भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकात सलग चौथ्यांदा अंतिम सामना खेळणारा पहिलाच संघ आहे. यापूर्वी 2020ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार प्रियम गर्गच्या नेतृत्वात अंतिम सामना गाठला होता. मात्र त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यापूर्वी 2018 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला होता आणि विजयही मिळवला होता.
भारताने अंतिम सामने खेळलेले 19 वर्षांखालील विश्वचषक –
2000 – कर्णधार – मोहम्मद कैफ (विजयी)
2006 – कर्णधार – रविकांत शुक्ला. (उपविजयी)
2008 – कर्णधार – विराट कोहली (विजयी)
2012 – कर्णधार – उन्मुक्त चंद (विजयी)
2016 – कर्णधार – इशान किशनच्या (उपविजयी)
2018 – कर्णधार – पृथ्वी शॉ (विजयी)
2020 – कर्णधार – प्रियम गर्ग (उपविजयी)
2022 – कर्णधार – यश धूल (??)