
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- माओवाद्यांनी जमिनीत पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात दोन्ही पाय गमावले असतानाही सेवेसाठी कायम तत्पर असलेले तालुक्यातील रातोना या अतिदुर्गम आदिवासी भागातील कोब्रा कमांडो रामदास भोगडे यांनी शिक्षण क्षेत्रात ही आपला ठसा उमटवला आहे.आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करताना तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषयांमध्ये ७८.८३ टक्के गुण मिळवून त्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केलेली असून त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सीआरपीएफच्या विशेष फोर्स संरक्षण तुकडीत दाखल झालेल्या जव्हार तालुक्यातील वडोली (रातोना) येथील रामदास भोगाडे या उमद्या जवानावर नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.कोब्रा कमांडो रामदास यांच्या तुकडीत २६ जवान असल्याने माओवाद्यांशी सामना करून आपल्या जवानांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.२९ नोव्हेंबर २०१७ रोजी छत्तीसगडमधील सुकमा येथे माओवाद्यांनी जमिनीत पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात रामदास यांचे दोन्ही पाय निकामी झाले.
परंतु देशसेवेची तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पुणे येथील तळेगाव कॅम्पस येथे देशसेवेसाठी तैनात राहिले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांच्या मार्गदर्शनानुसार रामदास यांनी खोडाळा येथील मोहिते कॉलेज मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रात प्रवेश घेऊन पदवी संपादन केली.गिरीवासी सेवा मंडळ,मोहिते कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,मुक्त विद्यापीठ खोडाळा केंद्राचे प्रमुख रघुनाथ मोरे यांनी गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र देऊन कोब्रा कमांडो रामदास भोगडे यांचे यांचे कौतुक केले.
मी देशसेवा करिता माझे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले आहे.जव्हार-मोखाडा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण ही अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करा.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आज मला खूप आनंद झाला आहे
कोब्रा कमांडो रामदास भोगाडे