
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
अ.दि.पाटणकर
पुणे :- मोटार वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ह्युंदाई या कंपनीच्या पाकिस्तानातील कार्यालयाने दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून आवश्यकता नसताना काश्मीरबाबत ” काश्मीर दिवस साजरा करताना काश्मीर मुक्त झाला पाहिजे” अशा पद्धतीची वादग्रस्त पोस्ट केली या विरोधात पतित पावन संघटनेने धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठासमोरील ह्युंदाई शोरूमसमोर कंपनीच्या विरोधात घोषणा व निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला.
पतित पावन संघटनेचे खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर यांनी याबाबत सविस्तर बोलताना सांगितले कि,ह्युंदाई या कंपनीने आपल्या व्यवसायावर लक्ष देणे गरजेचे असताना ज्या काश्मीरसाठी असंख्य भारतीय शूर वीर जवानांनी आणि नागरिकांनी आपले बलिदान दिले आहे आणि जे काश्मीर भारतीयांसाठी सन्मानाचा आणि गर्वाचा विषय आहे. त्या काश्मीर बाबत कंपनीच्या पाकिस्तानातील कार्यालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून अशा स्वरूपाची पोस्ट करणे म्हणजे भारतात राहणाऱ्या आणि भारतावर प्रेम करणाऱ्या तमाम देशप्रेमींच्या भावना दुखावत भारतीयांना आणि भारतीयत्वालाच आव्हान दिल्यासारखे आहे अशी पोस्ट करताना कंपनीला आपली कंपनी भारतातही व्यवसाय करते आणि भारताने कंपनीला फार मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे याचा विसर पडला कि काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आज आम्ही फक्त निदर्शने करून आमचा निषेध व्यक्त केला आहे मात्र यापुढे जर अशी चूक कंपनीकडून पुन्हा झाली तर आमची संघटना राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही.
यावेळी प्रशांत मोरे,आकाश कोंढाळकर,अजित पवळे,आदित्य बर्गे, राकेश शेटे,सचिन कांग्रेचा,आकाश लोढा,गिरीश काकडे,मनोज नायर, सिताराम खाडे,गोकुळ शेलार,धनंजय क्षीरसागर,संतोष शेडगे,स्वप्नील नाईक,राजाभाऊ बर्गे,प्रवीण ठाकूर,ललित खंडाळे, सौरभ पवार आदींसह पुणे शहर व विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते तर याचे नियोजन पतित पावन संघटना खडकवासला विभागा तर्फे करण्यात आले होते.