
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
रामपूर :- पंतप्रधान म्हणून त्यांची देशाप्रती नैतिक जबाबदारी आहे की नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले व्यक्ती असल्याचे लोक म्हणतात. मग त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास का सांगितले नाही?
काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीत एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषचे असल्याचे समोर आले.
संबंधित प्रकरणी अटक झालेल्या आशिषला जामीन मंजूर झाला. त्याचा संदर्भ घेऊन प्रियंका यांनी येथे प्रचारावेळी मोदींना लक्ष्य केले. मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्यानंतरही केंद्रीय मंत्र्याने राजीनामा दिला का? आता त्या मंत्रिपुत्राला जामीन मिळाला आहे. लवकरच तो मुक्तपणे वावरेल. मात्र, सरकार कुणाला वाचवत आहे? शेतकऱ्यांचे रक्षण सरकार करत आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. लखीमपूर खेरी प्रकरणावेळी पोलीस कुठेच दिसले नाहीत. मात्र, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना रोखण्यासाठी पोलीस हजर झाले, असा आरोपही त्यांनी केला.