
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत चिकलठाणा, बाबा पेट्रोल पंप ते वाळूज एकच उड्डाणपूल या विषयी सविस्तर चर्चा झाली. याबरोबरच नगर नाका ते माळीवाडा आणि दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद किल्ला ते वेरूळ लेणी या रस्त्याच्या विकास कामाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. चिकलठाणा, बाबा पेट्रोल पंप ते वाळूज असा एकच उड्डाणपूल असावा यासंदर्भात दिल्लीत बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
डॉ. भागवत कराड म्हणाले की, या बैठकीत औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी या मार्गाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग- 211ला निपाणी गावाजवळील शेंद्रा-कुंबेफळ-निपाणी हा जोडणारा मार्ग याविषयी देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे औट्रम घाटातील कामाच्या स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील. या सर्व कामांच्या माध्यमातून औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असून औरंगाबाद च्या विकासातील हे अभिनव प्रकल्प ठरतील, असा विश्वासही कराड यांनी व्यक्त केला.