
दैनिक चालु वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे,मुख्य कार्यकारी सिद्धरामय्या साली मठ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचे महत्व गावागावात,पाड्यापाड्यात, वाडी वस्तीत पटवण्यासाठी रवाना झालेल्या स्वच्छता रथाचे सभापती आशा झुगरे,उपसभापती लक्ष्मी भुसारा,गटविकास अधिकारी संगीता भांगरे,पंचायत समिती सदस्य युवराज गिरंधले,पंचायत समिती सदस्य भास्कर थेतले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाल्याची माहिती दि ११ फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी मिळत आहे.
यावेळी झेंडा दाखवुन रथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पंचायत समिती च्या विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या मिशनचे लोक चळवळीत रुपांतर होण्यासाठी प्रत्येक नागरीकांने राष्ठनिष्ठा जोपासत यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्या असे आवाहन स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांनी केलेले आहे.या डिजिटल रथाची प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नितिन आहेर यांनी तयार केली आहे.
जिल्हाभरात स्वच्छता,पाणी वापरा विषयक प्रभावी पद्धतीने जागरूकता निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण व्हावी या उद्देशाने डिजिटल माध्यमातून लघुपट,माहितीपट दाखवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 व जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करून जाणीव-जागृती होऊन स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल स्वच्छता रथाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गावागावात जनजागृती करण्याकरिता डिजिटल स्वच्छता रथाचा शुभारंभ यावेळी जिल्हास्तराप्रमाणे तालुकास्तरावर करण्यात आला आहे. या स्वच्छता रथाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना लघुपट दाखवून पाणी व स्वच्छता विषयांसंबंधी योजना व उपक्रम याविषयी माहिती देण्यात येणार असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.यामध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम, ना दुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, एक खड्डा शौचालयासाठी दुसरा खड्डा तयार करणे ,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक – सार्वजनिक स्तरावर शोषखड्डा मोहीम राबवणे,नाडेप व कंपोस्ट खते तयार करणे,तसेच गाव हागणदारी मुक्त प्लस म्हणून घोषित करणे यांचा समावेश आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणी करून प्रतिदिन प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रमाणे बारमाही स्वच्छ व गुणवत्तापूर्ण शाश्वत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.याकरिता लोकसहभागातून आराखडे तयार करणे,स्त्रोत बळकटीकरण करणे, महिलांना पाणी तपासणी प्रशिक्षण देणे,स्थानिक प्लंबर,फिटर, इलेक्ट्रिशियन यांना योजनेच्या देखभाल दुरुस्ती करिता प्रशिक्षण देणे इत्यादी उपक्रम अंतर्भूत आहेत.