
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोलकता :-तृणमूल कॉंग्रेसमधील कलह वाढीस लागल्याचे संकेत, पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसमधील कलह वाढीस लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, अंतर्गत कलह मिटवण्यासाठी तृणमूलच्या प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्या (शनिवार) सायंकाळी तातडीची बैठक बोलावली आहे. ममतांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसाठी केवळ सहा प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही समावेश आहे. जुने-जाणते नेते विरूद्ध तरूण नेते असा सुप्त संघर्ष तृणमूलमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे.
त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. अभिषेक यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या काही तरूण नेत्यांनी एक व्यक्ती, एक पद हे धोरण पक्षाने अवलंबण्याची गरज सोशल मीडियावरून व्यक्त केली. मात्र, ती भूमिका फेटाळून लावत काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे तसे कुठले धोरण नसल्याचे म्हटले. त्यामुळे तृणमूलमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. त्यापाठोपाठ ममतांनी बैठक बोलावल्याची माहिती पुढे आली. तृणमूल आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील संबंध ताणले गेल्याच्या बातम्याही काही दिवसांपासून येत आहेत. त्यामुळेही ममतांनी बोलावलेल्या बैठकीचे महत्व वाढले आहे.