
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरु करण्याअगोदरच्या शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
“दत्ता भरणे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझा भाऊही त्यांच्यासोबत होता. माझे वडिल आम्हाला लवकर सोडून गेल्यानंतर माझ्यावरु कुटुंबाची जबाबदारी आली. त्यावेळी मी शेती करायला लागलो. मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले. तुमचा विश्वास बसणार नाही. त्या काळामध्ये एक गाय विकली तर त्या किमतीतून एक एकर जमीन विकत घेत होतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या बांधाच्या समोर चार एकरांचा एक प्लॉट विकायला निघाला होता.
मी चार गायी विकल्या आणि त्या पैशातून मला चार एकर जमीन मिळाली. पण आज ते अशक्य आहे कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. हे मी स्वतः अनुभवले आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले.
निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. पण त्यांनी शेती आणि त्याच्यावर आधारीत असणाऱ्या जोडधंद्यावर लक्ष द्यायला पाहिजे होते. राज्याच्या अर्थसंकल्पात जे गरीब आहेत त्याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.