
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- चला हवा येऊ द्या या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवले. या शोमधून निलेश साबळे, भाऊ कदम , कुशल बद्रिके श्रेया बुगडे भारत गणेशपुरे, सागर कारंडे हे कलाकार घराघरात पोहचले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सागर कारंडे याने हा शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने लोकमतशी बोलताना केला आहे. त्याने या चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
अभिनेता सागर कारंडे सध्या चला हवा येऊ द्या या शो व्यतिरिक्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि ‘इशारो इशारो में’ या नाटकात काम करताना दिसतो आहे. नाटकांच्या प्रयोगांमुळे त्याने शो सोडला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र याबाबतचा खुलासा सागर कारंडेने नुकताच केला आहे. तो म्हणाला की, ही निव्वळ अफवा आहे. या वृत्तात अजिबात तथ्य नाही.
कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत, कारण लोकांना त्यादिवशी सुट्टी नसल्यामुळे ते प्रयोग पाहायला येत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील. माझे नाटक आणि शो या दोन्हीचे काम अगदी सुरळीत सुरू आहे.