
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील जालना रोडवर करमाड परिसरात एक धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली . ऐन सायंकाळी पाच वाजण्याची वेळ होती . करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिल्डिंग समोर विष प्राशन केलेले एक प्रेमी जोडपे आले . चालताना दोघांचेही झोक जात होते . विष प्राशन केल्याने चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली .
काही क्षणांत खाली कोसळले . हात-पाय तडफडत होते . दोघांनाही उलट्या होऊ लागल्या . एकदम कोसळल्याने दोघांचेही मोबाइल बाजूलाच पडलेले . परिसरातील नागरिकांनी या दोघांची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला . रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासल्या नंतर या दोघांनाही मृत घोषित केलं . जमलेल्या नागरिकांनी सांगितलेली ही आपबिती अतिशय धक्कादायक आहे .
कोण होते दोघे ? :-
करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडलेल्या या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली . तसेच त्यांचे मोबाइलही पोलिसांच्या हाती सोपवले . त्यावरून पुढील माहिती काढण्यात आली . हे दोघे दिर-भावजय असल्यांचं पोलिसांनी सांगितलं . करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वीच सदर महिला सत्यभामा कदम ही तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती .
सत्यभामा कदम ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या . दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला . तेव्हापासून सत्यभामा यांचा पोलीस शोध घेत होते . सत्यभामा कदम यांचे चुलत दिर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .
वाहनचालक आणि गृहिणी :-
या घटनेतील तरुण काकासाहेब कदम हे शेती करून मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते . त्यांच्या पश्चात पत्नी , आई , वडील , मुलगा , मुलगी असा परिवार आहे . तर सत्यभामा कदम या गृहिणी होत्या . त्यांच्या पश्चात पती , सासू , सासरे , दोन मुले असा परिवार होता . करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल हे सदर घटनेचा पुढील तपास करीत आहे .
विष प्राशन व उलट्यांनी परिसरात दर्प :-
सदर प्रेमी युगुल करमाड येथील रोडवर आल्यानंतर त्यांना विषप्राशन केल्यामुळे झटके येत होते . उलट्यांचा त्रासही होऊ लागला . त्यामुळे परिसरात विषारी दर्पही पसरला होता . करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंह जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला . शेख अनिस हे तत्काळ १०८ ची रुग्णवाहिका घेऊ घटनास्थळी दाखल झाले . दोघांनाही तत्काळ चिकलठाणा येथील मिनी घाटीत नेण्यात आले . मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता .