
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
समतेसाठी आणि गावासाठी आपली गर्दन तळहातावर पेलवून बलिदान देणारा नरवीर राणोजी साठे मांग यांच्या पोटी १ मार्च १८८५ रोजी या व्यवस्थेने नीच ठरवलेल्या व पूर्वापार पासून शोषण होत असलेल्या मांग जातीत पूर्वीचा सातारा म्हणजेच आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे महानायक क्रांतिवीर फकिरा यांचा जन्म झाला. गाव आणि मांगवाडा यांच्यात एक मोठी दरी होती. दरी म्हणजे वाद नाही तर गावाला मांगवाड्यात किती मानस राहतात. ते काय खातात कसे जगतात याचा काहीच ठावपत्ता नव्हता.
फक्त त्यांना मांगवाडा कुठे आहे एवढच माहित होत. आणि ही दरी ओळखून नरवीर राणोजी ने वाटेगावात जोगणी आणण्याचा निश्चय केला. यामागचा राणोजीचा हेतू हा होता की गाव आणि मांगवाडा ही दरी कायमची मिटावी. गावाने मांग समाजाच्या सुख दुःखात सामील व्हावं अन् मांग समाजाने गावाच्या सुख दुःखात सामील व्हावं. गावात समता नांदावी. गावचा नावलौकिक व्हावा. हा राणोजी चा हेतू होता. पण जोगनी आणने म्हणजे सोपी गोष्ट नव्हती.
त्यासाठी मनगटात बारा हत्तीच अन् काळजात वाघाच बळ लागत. कारण एकटा मानुस दहा माणसांशी कटून लढू शकतो. पण या खेळात हजारो माणसांसोबत एकट्याची लढाई होती. आणि जोगनी आणत असताना त्यांच्या हद्दीत सापडला तर डोस्क मारण्याची रीत होती. त्यावेळी अवघ्या दहा वर्षाचा फकिरा आपल्या बापाला सांगतो “आबा मारुदे डोस्क तू, आन वाटी हिसकून” आणि हा आपला लेक आपला जाती धर्म बोलतोय असा विचार करून राणोजी ने तलवार हाती घेतली. अन् वाटेगावचा तो नरवीर राणोजी हजारो माणसांबर एकटा लढला. त्याच्या तलवारीच पात वाऱ्याला झुंज देत होत.
त्याच शौर्य तांडव उसळत होत. अखेर त्यान त्या लढाईत विजय मिळवला. त्याने प्राण सोडला पण शान सोडली नाही. रानोजीचा हेतू साध्य झाला होता कारण इतिहासात पहिल्यांदाच एका मांगाचा दुखवटा पुऱ्या गावान पाळला होता. फकिराच कार्य, कर्तृत्व, त्यान दिलेला शोषितांसाठीचा समतेचा लढा त्याच्यासोबतच घालवण्याचा घाट इथल्या जुलमी अन् धर्मांध व्यवस्थेने घातला होता. परंतु जगद्विख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचा हा अजेंडा आपल्या कादंबरीच्या माध्यमातून मोडून काढून फकिराच कार्य, कर्तृत्व, लढा या जगासमोर मांडला.
तो काळ अतिशय भयानक होता. एकीकडे दुष्काळाने मातम घातला होता तर दुसरीकडे साथीच्या रोगान थैमान घातला होता. आणि या परिस्थितीत इथला मांग, महार, रामोशी, चांभार, भटके, शोषित, कष्टकरी अन्न पण्यावाचून तडफडून भाकरी-भाकरी करून मरत होते. पण त्यांच्या जगण्याला आणि मरण्याला कोणी वाली उरला नव्हता. सरकार त्यांची हेळसांड करत होत. अन् धनदांडगे त्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत होते.
तेव्हा भाकरीवाचून तडफडून मरणाऱ्या माणसांकडे बघून फकिराने निश्चय केला अन् म्हणाला “माणसाच्या जगण्या आड जर कायदा येत असेल तर तो कायदा झुगारून मानस वाचवण्यासाठी वेळप्रसंगी चौकट तोडली पाहिजे. मरान हे माणसाच्या पाचवीलाच पुजलय. मरान हे साऱ्यासणी येणार, सारच मरणार पर मरणात भी डाव उजव असतय. कुत्र्याच्या मौतिन माणूस मेल नी जगल सारखच.” उकिरड्यावरच खाऊन कुत्री ही जगतात अन् आम्ही तर मानस आहोत.
कुत्र्याच्या मौतिन मरण्यापेक्षा या व्यवस्थेला ओरबाडून मारून मरू. आपण तलवार घेऊन त्यांच्या उरावर नाचल पाहिजे. अस म्हणून फकिराने शोषितांच्या काळजात वणवा पेटवून मानस जगवण्यासाठी माळवाडीचा मटकरी फोडला. त्या धनदांडग्या मठकऱ्याच धान्याचं गोदाम लुटून. भाकरीसाठी तडफडणाऱ्या माणसांच्या पोटात ते खाली केलं. ते शोषित, कुपोषित मानस फकिराने बंड ठोकून आणलेली भाकरी भुकेच्या जबड्यात घालून त्या महाभयंकर रोगाशी अन् उपासमारीशी दोन हात करू लागली होती.
गोऱ्या इंग्रजांचा कायदा गरीब शोषित माणसांच्या जीवावरच उठला होता. एकीकडे दुष्काळ दुसरीकडे उपासमारी अन् हे कमी होत म्हणून त्यात गुन्हेगार जमातीचा तीन वेळच्या हजरी चा कायदा. माणसं कशी बशी जगत होती. ज्यांची जगण्याची इच्छा संपली होती ती मरत होती. त्यावर फकिरा म्हणत होता “आमच्यावरच हा अन्याय का? सरकारन हवं तर आमची गर्दन मारावी, आम्हाला तुरुंगात टाकावं पण तस न करता आमच्यावर ही गुलामी का?” अस म्हणत या जुलमी कायद्याला लाथाडून सरकारचा आदेश पाळून जुलूम करणाऱ्या रावसाहेब पाटलाचे दात पाडून एकाच लाथेत त्याच कंबरडं मोडून.
छत्रपती शिवाजी राजांनी त्याच्या पूर्वजांना दिलेली ती तलवार हाती घेऊन शोषित, उपेक्षितांच्या न्याय, हक्कासाठी फकिरा जीवावर उधार झाला. अन् तो फरारी झाला. अन् तिथच त्याला अन्यायाची चीड अन् लढण्याची धमक असणारी मानस येऊन मिळू लागली. फकिरा त्या शोषित, पिढीत अन् या जुलमी सरकारने गुन्हेगार ठरवलेल्या जिवंत माणसांचा म्होरक्या झाला. मानस जगली पाहिजेत अन् या जुलमाच्या सरकारला अद्दल घडली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेऊन. फकिरा नावाचं वादळ अन् ब्रिटिशांच मराण गबऱ्यावर बसून त्या महाराष्ट्राच्या लढवय्या मातीत थैमान घालू लागल.
त्यावेळी वाटेगावचा फकिरा हे नाव ऐकताच कसलाही सरदार असो वा शिपाई असो थर थर कापत होते. त्या गोऱ्या सरकारने आमच्यावर मुलुखाचा अन्याय केला, मग आम्ही का त्यांना ढील सोडायचं म्हणून ब्रिटिशांचा मुंबई वरून कोल्हापूरला जाणारा अन् भेडसगाव मध्ये विसाव्याला थांबणारा इंग्रजांचा खजिना फकिरा व त्याच्या सवंगड्यांनी वाजत गाजत जाऊन फोडला. अन् गोरगरीब जनतेत वाटला. फकिरा म्हणजे भारताचा रॉबिन हुड होता. त्यावेळी गावोगावी फकिराचे पोवाडे गायले जायचे गरिबांचा शोषितांचा तारणकर्ता म्हंटल की प्रत्येकाच्या मुखी फकिरा हेच नाव यायचं.
इंग्रजांना फकिराची दहशत अन् त्याच राष्ट्रप्रेम पाहून भलतीच धडकी भरली होती. फकिराला कैद करण्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केलं होत. शेवटी ज्या माणसांसाठी फकिरान डोक्याला कफन बांधल होत. ती माणसचं सरकारन दावणीला लावली. अन् ज्या माणसांसाठी आपण बंड केलं त्याच माणसांचा जीव त्या ब्रिटिशांच्या दावणीला होता म्हणून फकिरान आत्मसमर्पण केलं. फकिरा नेरल्याच्या माळाला स्वाधीन झाला. फकिराला पाहून जॉनसाहेब म्हणाला कोण आहेस तू. त्यावर फकिरा म्हणाला म्या हाय फकिरा राणोजी. ‘फकिरा’ हे नाव ऐकताच थंड पडलेली ब्रिटिशांची हत्यार गरम झाली अन् फकिरावर स्थिरावली. त्यावर फकिरा म्हणतो “साहेब मला हत्याराच भ्या दाखवू नका.
तलवारीबर आमचं लगीन लागलय. म्या ठरीवल तर तुम्हा समद्यासणी सर्गाला धाडून हतन निघून जाईन. पर मी माझ्या माणसांसाठी स्वाधीन झालोय.” मरणाच्या दाढेत जाऊन मृत्यूला आव्हान देणारा तो फकिरा खऱ्या अर्थानं शोषितांच्या क्रांतीचा नारा आहे. शोषितांच्या लढ्याचा मायबाप आहे. ज्या प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटलांनी फकिराचा आदर्श घेऊन स्वातंत्र्य संग्रामात झेप घेतली. त्याच पद्धतीने शोषित, पिढीत, कष्टकऱ्यांनी फकिराच्या त्या क्रांतीच्या लढ्याची प्रेरणा घेऊन फकिरा हा नारा देऊन गुलामीला पायदळी तुडवल पाहिजे अन् जुलमी व्यवस्थे विरुद्ध बंड ठोकल पाहिजे..!!
सुरज साठे
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
जन्मभूमी वाटेगाव