
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- घुंगराळा शिवारातून एका ट्रॅक्टर चालकाला रस्त्यावर थांबवून त्याच्या ट्रॅक्टरचे हेड बळजबरीने चोरून नेणा-या कार चालकांना नांदेड जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाने क्रमांक ११२ वर माहिती प्रसारीत केल्यानंतर देगलूर पोलीसांनी हा चोरीचा ट्रॅक्टर आणि चोरटे कांही तासातच ताब्यात घेतले. कुंटूर पोलीसांनी या चोरट्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर या तीन चोरट्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दहिकळंबा ता.कंधार येथील साहेबराव शिंदे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२६ बी.क्यू.१९१४ हा अंकुश प्रेमदास चव्हाण हा चालवत होता. १० फेबु्रवारी मध्यरात्रीनंतरच्या ३ वाजताच्या सुमारास तो नांदेड-नायगाव रस्त्यावरून जात असतांना घुंगराळा शिवारात कार क्रमांक एम.एच.२४- व्ही.९७०२ ने त्याला थांबवले.
चालक अंकुश चव्हाणला ट्रॅक्टरच्या खाली उतरवून ट्रॅक्टरचे हेड ९ लाख रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले. घडलेला प्रकार अंकुश चव्हाणने कुंटूर पोलीसांना कळवला. तसेच नियंत्रण कक्षातील तातडीची मदत क्रमांक ११२ वर कॉल केला. ११२ वरून प्रसारीत झालेल्या माहितीचा संदेश देगलूर पोलीसांना मिळाल्यावर देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अशोक यरपलवाड आणि मिर्झा अहेमद बेग यांच्या पथकाने ट्रॅक्टर हेड आणि चोरी करणारी चार चाकी गाडी आणि त्यात असणारे आरोपी अतुल लक्ष्मण गुंडे, पांडुरंग सुग्रीव शिंदे, हरिदास ब्रह्मदेव शिंदे, रा. हागळुर ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या तीघांना ताब्यात घेतले.
याबाबत कुंटूर ठाण्यात २४ /२०२२ कलम ३९२,३४१,३४, भा.दं.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटुर पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आटकोरे करीत आहेत.