
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गत साडेतीन महिन्यांपासून राज्यासह लातूर विभागामधील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा •आगारात संप सुरू आहे. मात्र, शासन या मागणीसह आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह शुक्रवारी लातुरातील औसा गोरोबा खुरपे घार, प्रशांत रोडवरील छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
एसटी महामंडळाच्या कार्मचाऱ्यांचे, कामगारांचे दिवाळीपासून आंदोलन सुरू आहे. एवढा प्रदीर्घ काळ एसटी कर्मचारी, कामगार संपावर आहेत. लातूर जिल्ह्यातील पाचही आगारांसमोर कामगार आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला दुखवट लढा असे नाव देण्यात आले आहे. १०८ दिवसांपासून त्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. आंदोलनादरम्यान, राज्यभरात ८५ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तरीही सरकारला अद्याप जाग आली नाही. यावर अद्यापही राज्य शासनाकडून तोडगा काढण्यात आला नाही.
यासाठी लातूर शहरातील औसा रोडवर छत्रपती चौकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबीयांसह रास्ता रोको आंदोलन केले. गत साडेतीन महिन्यांपासून राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर असून, शासनाकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. परिणामी, प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्यांबाबत विचार करावा, या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करीत आहोत, असे आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
राज्य शासनाने तातडीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महिला, पुरुष कर्मचारी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. या रास्ता रोको आंदोलनामुळे काहीवेळ, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस बंदोबस्त तैनात होता.