
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- आगामीपावसाळा चार महिन्यांवर आलेला असतानाही किनवट बोधडी-भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक लहान मोठ्या पुलासहित महामार्ग मजबुतीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व संथगतीने चालू असल्यामुळे या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. किनवट-बोधडी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामाला गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरुवात केली, परंतु गेल्या पाच वर्षापासून या कामाची गती पाहता येत्या पाच वर्षात हा रस्ता होईल का नाही? याबाबत सध्यातरी सांगणे अवघड दिसत आहे.
किनवट बोधडी,धानोरा, दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अनेक ठिकाणी सुरुवातही झाली नाही. वनविभागाच्या अडथळ्याच्या नावाखाली या भागातील नागरिकांना अक्षरशः मृत्यू समोर दिसणाऱ्या रस्त्यावरून नाइलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. प्रचंड खड्डेमय रस्ता खाच-खळगे वाहनाने उडणारा प्रचंड धुराळा अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते पुलासाठी बनवलेले वळण रस्ते इत्यादी अडथळ्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांच्या या त्रासाची संबंधित गुत्तेदार व अभियंत्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड आणि लोकप्रतिनिधींना काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
बोधडी पासून जवळच असलेल्या वाळकी नाल्यावरील पूल गेल्या एक-दिड महिन्यापूर्वी जमीनदोस्त केला, पण अद्यापही कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे हा पूल पावसाळ्यापूर्वी तयार होणे गरजेचे आहे,कारण अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर येऊन पावसाळा येवून ठेपलेला असल्यामुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी,प्रवासी इत्यादींना प्रचंड त्रासदायक ठरत आहे.विशेष म्हणजे येथून काही अंतरावरच जिल्हा परिषद हायस्कूल,शासकीयआदिवासी मुलींची आश्रमशाळा याच मार्गावर हाकेच्या अंतरावर आहे.
पावसाळ्यात या नाल्यावर दरवर्षी किनवट-भोकर या राष्ट्रीय महामार्गावरुन वाहतूक विस्कळीत होण्याची परंपरा याही वर्षी चालू राहते की काय?याची प्रचंड चिंता नागरिकांना लागलेलेआहे. किनवट भोकर या मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे, त्या ठिकाणी या भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनेला सामोरे जावे लागत आहे.
याहीवर्षी जलधरा, सावरगाव,धानोरा, सावरी, थारा, वाळकी,चिखली इत्यादी गावच्या पुलाचे काम अर्धवटअसल्यामुळे यावर्षीही वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊन डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असताना, ही राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्यासंबंधी ब्र शब्द काढण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांनी कामाला गती नदिल्यास अखिल भारतीय किसान सभा शाखा बोधडी बुद्रुकच्या वतीने तीव्रआंदोलन छेडण्याचा इशारा कॉ.आडेलू बोनगीर, श्रीधर डोंगरे,श्याम वाकोडे, गजानन चव्हाण यांनी निवेदनव्दारे इशारा दिला आहे.