
दै.चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी बजेटमध्ये वाढीव निधीची तरतूद करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज असली येथे केले. बचतगटांना कर्ज वितरण समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, गीता पाडवी, रुपसिंग तडवी, आदिवासी विकास महामंडळच्या प्रादेशिक व्यवस्थापिका प्रतिभा पवार, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे, तालुका अभियान व्यवस्थापक नाना पावरा, प्रभाग समन्वयक बळीराम पावरा, नितिन वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, आदिवासी भागामध्ये कुक्कूटपालन, शेळीपालनासाठी बचतगटाना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी यावर्षी बजेटमध्ये अधिकाधिक तरतूद करण्यात येईल. आदिवासी भागामध्ये आदिवासी माणसाने कर्ज घेतले आणि कर्ज फेडता आले नाही म्हणून कधी आत्महत्येसारखे पाऊल उचलले नाही, याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या घरात बकरी व कोंबडी असते. ज्यावेळी त्यांना पैशाची गरज असते त्यावेळी तो बाजारात जातो आणि आपल्या मुलभूत गरजा भागवितो. त्यामुळे ग्रामीण भागात कुक्कूटपालन व शेळीपालन हा व्यवसाय वाढला पाहिजे यासाठी बचतगटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲड.पाडवी यांच्या हस्ते राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली पुरस्कृत मुदत कर्ज योजनेतून शबरी आदिवासी विकास महामंडळातंर्गत अक्कलकुवा, तळोदा व धडगाव तालुक्यातील 59 बचतगटांना व वैयक्तिक लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. यात महिला सशक्तिकरण योजनेतंर्गत 47 लाभार्थ्यांना विविध व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाखाप्रमाणे 47 लाखाचे तर लहान उद्योगधंदे अंतर्गत 7 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाखाप्रमाणे 14 लाख रूपये, गॅरेज, ऑटोवर्क शॉप, स्पेअरपार्ट उद्योगासाठी 2 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 लाखाप्रमाणे 10 लाख, प्रवासी वाहनासाठी एका लाभार्थ्यांला 9 लाख 10 हजार तसेच स्वयंसहायता बचतगट 2 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 लाखप्रमाणे 10 लाखाचे असे एकूण 90 लाख 10 हजाराचे कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी बचत गटाशी मुक्तपणे संवाद साधून बचतगटांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
तसेच बचतगटांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नाना पावरा तालुका अभियान व्यवस्थापक यांनी अभियान व शेतीविषयक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी नितीन वळवी, बळीराम पावरा, CRP व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले