
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मुंबईतील अनेक ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात येत असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणी महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दाऊद इब्राहिम हा परदेशातून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
तसेच मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून या माध्यमातून पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असून बॉम्बस्फोटानंतर लगेचच तो दुबईमार्गे पाकिस्तानात पळून गेला होता. त्याचे कुटुंबही पाकिस्तानात आहे.
दाऊद इब्राहिमवर लष्कर-ए-तैयबा इत्यादी कुख्यात दहशतवादी संघटनांसह संबंध असल्याचेही बोलले जाते. दरम्यान दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये ईडीचे छापे सुरू असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे जोडली जाऊ शकतात, असे चिन्ह दिसून येत आहेत.