
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निलेश लंकेंच्या मार्गदर्शनाखाली पारनेर च्या नगर पंचायतीवर झेंडा फडकावला
पारनेर :- संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर नगर पंचायतीवर आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला.काही दिवसांपूर्वी दैनिक चालु वार्ता ने विजय सदाशिव औटी हे नगराध्यक्ष तर सुरेखा ताई भालेकर उपनगराध्यक्ष निवडले जातील असा अंदाज वर्तवला होता,तो आज तंतोतंत खरा ठरला. पारनेर नगर पंचायतची निवडणूक नुकतीच झाली होती.या निवडणूकीत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचता आले नाही.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन बहूमत मिळवले.
आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांची निवड झाली.या निवडणुकीला पीठासीन अधीकारी म्हणून पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले.राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेनेतर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने औटी यांची निवड निश्चित झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी उद्योजक अर्जुन भालेकर यांच्या पत्नी सुरेखा भालेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.त्यानुसार सुरेखा भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.अपेक्षेप्रमाणे त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली.
पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आमदार निलेश लंके यांच्यासह गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.