
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असं विधान करून खळबळ उडवून दिली. असे कोणतेही बदल होणार नाही, याचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख ठरवतील, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलेंची शक्यता फेटाळून लावली आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत आपली भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. ‘संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या आरोपाची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. त्यांच्या आरोपामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालवायचे आहे, सरकारला कोणताही धोका नाही, असं अजित पवार म्हणाले.
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्चला मंत्रिमंडळामध्ये बदल होईल असा दावा केला होता. पण, हे सरकार शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणले आहे. सरकारमध्ये काही बदल करायचे आहे की नाही, हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ठरवतील.