
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. तसेच, किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख केला. तर, शेवटी मोहित कंबोज या भाजप नेत्याच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर, मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच, राऊत यांच्यासमवेतचा एक फोटोही शेअर केला आहे.
उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हे साडेतीन नेते कोण असा सवाल राज्यातील लोकांना पडलेला असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, मी त्याला ओळखत नाही. या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या या आरोपावर मोहित कंबोजने उत्तर दिलं आहे. तसेच, राऊत यांच्यासमवेतचा फोटोही शेअर केलाय.