
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- १० मार्च रोजी ५ राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असून त्या घडामोडींचे नेतृत्व महाराष्ट्र करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आक्रमक पत्रकार परिषदेवरील प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ईडी लोकांना कसे घाबरवते याचे सविस्तर वर्णन केले आहे. तसेच भाजपच्या किरीट सोमय्या यांचाही त्यांनी पर्दाफाश केला आहे. येत्या काही दिवसांत ते या संबंधित सगळी कागदपत्र घेवून ईडीकडे जाणार आहेत आणि जर तिथे काही हालचाल केली नाही तर ते ‘ईओडब्लू’ कडे जातील.
नवाब मलिक पुढे म्हणाले, या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात आम्ही येत्या काळात एक ठोस भूमिका घेणार आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष येत्या काळात बसून याबाबतची रणनिती तयार करणार आहोत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत. बिगर भाजप सगळे आता १० मार्च नंतर एकत्र येवून एक ठोस भूमिका घेवून जनतेसमोर जाणार असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही केसीआर यांच्याशी फोनवरुन विरोधी पक्षांच्या एकत्रिकरणाला पाठिंबा दिला आहे.